नोटबंदी विरोधात काँग्रेसजन रस्त्यावर
By admin | Published: January 7, 2017 12:49 AM2017-01-07T00:49:31+5:302017-01-07T00:49:31+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटबंदीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असल्याचा आरोप करीत
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत निघाला मोर्चा
वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटबंदीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वात मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहचताच एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना घेराव घालून निवेदन सादर केले. मोर्चाच्या माध्यमातून नोटाबंदीच्या दुष्परिणामाचा निषेध नोंदविण्यात आला.
जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चात कॉग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, आ. रणजित कांबळे, प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, शहराध्यक्ष राजेश शर्मा, महासचिव प्रवीण हिवरे, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. तत्पूर्वी प्रदीप मंगल कार्यालयात सभा पार पडली. या सभेला प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण, आ. विजय वडेट्टीवार यांच्यासह चारूलता टोकस यांनी मार्गदर्शन केले. नेत्यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर हा मोर्चा नियोजित मार्गे रवाना झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
वर्धा : सामान्य रुग्णालयापासून निघालेला हा मोर्चा इतवारा चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. या मोर्चात सहभागी नागरिकांच्या हाती असलेले फलक व त्यावरील घोषवाक्य आकर्षक ठरले. येथे चारूलता टोकस व आ. कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळला. हा मोर्चा पं.स. कार्यालयाजवळ पोहोचताच पोलिसांच्यावतीने मोर्चा येथे रोखण्यात आला.
त्यानंतर मोर्चेकरांचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरिता रवाना झाले. सदर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शैलश नवाल यांना निवेदन देऊन त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. या शिष्टमंडळाच्यावतीने नोटबंदीमुळे निर्माण झालेली स्थिती व सर्वसामान्यांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेतमालाला मिळत असलेले दर, शेतकऱ्यांकडून कर्जाची अव्वाच्या सव्वा दराने होत होत असलेली वसुली, यामुळे होत असलेल्या आत्महत्यांवरही चर्चा करण्यात आली. भाजीपाला वर्गीय शेतमालाचे दर पडल्याने शेतकरी ते फुकटात वाटत आहेत. काही ठिकाणी ते रस्त्यावर टाकत असून याकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या सर्व प्रकाराची माहिती वरिष्ठांकडे पोहोचविण्याकरिता हे निवेदन देण्यात येत असून ते वरिष्ठांना पाठविण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
या मोर्चात जिपचे माजी अध्यक्ष विजय जयस्वाल, ज्ञानेश्वर ढगे, माजी सभापती मनोज वसू, वर्धा कृउबाचे उपसभापती पांडुरंग देशमुख, सभासद पुरुषोत्तम टोनपे, माजी नगराध्यक्ष आकाश शेंडे, प्रकाश डफ यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)