पिकांची लागवड करताना जमिनीचा विचार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:57 PM2018-05-26T23:57:20+5:302018-05-26T23:57:20+5:30
शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन कुठल्या गुणवत्तेची आहे याचा विचार करूनच विविध पिकांची लागवड करावी. शिवाय शेतातील मातीचे परीक्षण करून आवश्यक तितक्याच प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन कुठल्या गुणवत्तेची आहे याचा विचार करूनच विविध पिकांची लागवड करावी. शिवाय शेतातील मातीचे परीक्षण करून आवश्यक तितक्याच प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी केले.
सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून २४ मे ते ७ जून या कालावधीत ‘उन्नत शेती-प्रगत शेतकरी’ हा उपक्रम जिल्ह्यातील कृषी विभागाकडून राबविण्यात येत आहे. या पंधरवाड्या उपक्रमाचा उद्घाटनपर कार्यक्रम रोठा येथे पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समन्वयीत शेतकरी उत्पादक कंपनी वर्धाचे अध्यक्ष नरेंद्र काळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून महाबीज अकोलाचे विपणन महाव्यवस्थापक रामचंद्र नाके, सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. पी.एस. उंबरकर, कृषी विषय विशेषज्ञ डॉ. रुपेश झाडोदे, महाबीज नागपूरचे विभागीय व्यवस्थापक लिलाधर मेश्राम, केम प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक दिनेश राठोड आदींची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांचे उत्पन्न सन २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ‘उन्नत शेती-समुद्ध शेतकरी’ हा पंधरवाडा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना प्रमुख पिकांकरिता आधुनिक आणि अद्यायावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणे. शेतकरी हितार्थ असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देणे. जमिनीची सुपिकता वाढविण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे. बीज प्रक्रियेबाबत विशेष कार्यशाळा आयोजित करणे. पीक विमा योजनेचे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कवच देणे. विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देणे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे. वेळोवेळी योग्य मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांना एम किसान पोर्टलशी जोडणे आदीसाठी जिल्ह्यात सुमारे ४७४ ठिकाणी विशेष कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मेघा कुमरे, अजय फुलझेले, कवडु साखरकर आदींनी सहकार्य केले.