नूतनीकरणाने सेवाग्राम आश्रमात सुसंगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 01:01 AM2017-11-24T01:01:20+5:302017-11-24T01:01:50+5:30
गांधीजींचे विचार, कार्य जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे वास्तव्य असलेल्या सेवाग्राम आश्रम परिसरात अनेक नुतनीकरणाच्या कार्याला प्रारंभ झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : गांधीजींचे विचार, कार्य जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे वास्तव्य असलेल्या सेवाग्राम आश्रम परिसरात अनेक नुतनीकरणाच्या कार्याला प्रारंभ झाला आहे. २०१७ ला आश्रमाला ८१ वर्ष पूर्ण झाले. नुतनीकरणासह बांधकाम करून सुसंगती ठेवण्याचा प्रयत्न आश्रम प्रतिष्ठानचा आहे. याचा सकारात्मक परिणाम पर्यटकांच्या वाढलेल्या संख्येच्या स्वरुपात दिसून येतो.
स्मारक व आश्रम परिसरातील ईमारतीचे संरक्षण करण्यासाठी व आयुष्य वाढविण्यासाठी नुतनीकरण केले. स्थानिक साधन, साहित्य, कारागिरांच्या माध्यमातून त्यावेळी आश्रमाची निर्मिती करण्यात आली होती. या बांधकामाला ८१ वर्ष झाल्याने काहींची अवस्था खराब होती. दुरूस्तींची गरज लक्षात घेवून कामाला सुरूवात करण्यात आली. यात स्मारकांची विशेष काळजी घेण्यात येत आहे.
उर्वरित वास्तूंचा जुना लूक कायम ठेवला आहे. त्यामुळे त्या वातावरणाशी सुसंगत आहेत. आश्रमातील सौंदर्यात भर घालत आहे. रसोड्याची दुरूस्ती केल्याने ते अधिक सुरक्षित व मजबूत झाले. ग्रामोद्योगाच्या कामांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र बांधकाम केले. आश्रम स्थापनेपासून शेती व गोशाळा परिसरत परंपरागत पद्धतीने जतन केला होता. गोशाळेचे छत कवेलू व लाकडी बल्ल्यांचे होते. काळानुरूप त्यात बदल करण्यात आले आहे. प्रोफाईल शीटचा वापर करून ते सुरक्षित केले. शिवाय पावसाळ्यातील पाणी जिरविण्याची सुविधा केली. धान्य भंडार, कार्यकर्ता निवास आदिंची सुरक्षितता लक्षात घेवून आवश्यक बदल केले.
यात्री निवास जीर्णावस्थेत होते. येथे प्रोफाईल शीटचा वापर करण्यात आला. अनेक बदल केले तरी त्याचा लुक कायम ठेवल्याने वातावरणाशी सुसंगती साधली जाते.
संस्थेसाठी यात्री निवस महत्वाचे असून या ठिकाणी विविध संस्था, संगठना, शासकीय चळवळींच्या सभा व संमेलन होतात. शिवाय संस्थेला यातून उत्पन्न देखील मिळते. या कार्यासाठी जमनालाल बजाज फाऊंडेशनने आर्थिक सहाय्य केले असल्याचे सांगण्यात आले.
महादेव कुटीमध्ये कापूस ते कापड गांधीजींच्या या रचनात्मक कार्याची सुरुवात करण्यात आली. कताई, रंगाई, विनाई आफी उपक्रम येथे चालतात. यातून रोजगार निर्मिती झाली. स्वावलंबनासोबत प्रशिक्षण हे बापूंच्या विचारांना अनुसरुन असल्याने त्याचप्रमाणे कार्य करण्याचा प्रयत्न आश्रम प्रतिष्ठान करीत आहे. गांधी १५० च्या अनुशंगाने होणारे कार्य जमेची बाजू ठरत असल्याचे दिसत आहे.
आश्रम तथा परिसरात नूतनीकरण व बांधकाम करण्यात आले. स्मारक कट्ट्याची त्याच पद्धतीने दुरूस्ती करण्यात आली. अन्य वास्तूंना मात्र गरज व संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत करण्यात आले. यात ‘प्रोफाईल शीट’चा वापर करावा लागला. बदल आश्रम वातावरणाला समोर ठेवून सुसंगत केल्याने सकारात्मक परिणाम साधता आला.
- प्रा.डॉ. श्रीराम जाधव, मंत्री, आश्रम प्रतिष्ठान, सेवाग्राम