शहीद जवानाच्या कुटुंबाचे आमदारांनी केले सांत्वन
By admin | Published: March 21, 2017 01:19 AM2017-03-21T01:19:35+5:302017-03-21T01:19:35+5:30
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सीआरपीएफ व माओवाद्यांच्या ११ मार्च रोजी झालेल्या धुमश्चक्रीत सीआरपीएफचे १२ जवान शहीद झाले.
मुलांच्या शिक्षणाची स्वीकारली जबाबदारी
वर्धा : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सीआरपीएफ व माओवाद्यांच्या ११ मार्च रोजी झालेल्या धुमश्चक्रीत सीआरपीएफचे १२ जवान शहीद झाले. यात जिल्ह्यातील सोनोरा (ढोक) येथील रहिवासी व नाचणगाव भागात वास्तव्यास राहणारे प्रेमदास मेंढे शहीद झाले. आ. रणजीत कांबळे यांनी सोमवारी शहीद कुटुंबाची भेट घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेले प्रेमदास मेंढे यांना त्यांच्या निवासस्थानी आमदारांनी श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी शहिदाची पत्नी हर्षदाताई, कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. मुलगा आर्यन व मुलगी गुंजन या दोघांची आस्थेने चौकशी करीत त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी आ. कांबळे यांनी स्वीकारली. सोबतच शहीद परिवाराला आवश्यक ती मदत देण्याच्या सूचनाही यावेळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. देवळी पंचायत समितीचे माजी सभापती मनोज वसु, प्रमोद वंजारी, श्यामराव तराळ, बहादूर चौधरी, सुनील बासू, मनीष गंगमवार, आकाश बोंदाडे, विनोद मगर आदी याप्रसंगी उपस्थित होते. शहीद परिवाराची नियमित भेट घेऊन या कुटुबीयांना कोणतीही अडचण येणार नाही या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचनाही आ. कांबळे यांनी दिल्या.
कुटुंबापासून दूर राहून देशाच्या संरक्षणाकरिता लढणाऱ्या वीर जवानांचे उपकार मोठे आहेत. वेळप्रसंगी हौतात्म्य पत्करणाऱ्या या जवानांचा सार्थ अभिमानच आहे. शहिदांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती मदत करणे, हे आपले कर्तव्य आहे. त्या कुटुंबीयांची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार असल्याचेही यावेळी आ. रणजीत कांबळे यांनी सांगितले.(कार्यालय प्रतिनिधी)