देशासाठी राज्यघटना तर समाजासाठी ग्रामगीता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:16 AM2018-12-22T00:16:15+5:302018-12-22T00:16:34+5:30

देशाचा कारभार कसा चालवावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. तसेच समाजाच्या जडणघडणीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने राज्यघटना आणि ग्रामगीता वाचली पाहिजे, असे प्रतिपादन साहित्यिक व कवी ज्ञानेश वाकुडकर यांनी केले.

Constitution of the country and gramgita for the society | देशासाठी राज्यघटना तर समाजासाठी ग्रामगीता

देशासाठी राज्यघटना तर समाजासाठी ग्रामगीता

Next
ठळक मुद्देज्ञानेश वाकुडकर : ‘वर्धा ग्रंथोत्सव-२०१८’चे उद्घाटन, शहरात ग्रंथदिंडीतून केली वातावरण निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशाचा कारभार कसा चालवावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. तसेच समाजाच्या जडणघडणीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने राज्यघटना आणि ग्रामगीता वाचली पाहिजे, असे प्रतिपादन साहित्यिक व कवी ज्ञानेश वाकुडकर यांनी केले. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वर्धा ग्रंथोत्सव- २०१८’ च्या उद्घाटन समारंभाप्रसगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
स्थानिक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ.पंकज भोयर तर प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ साहित्य संघाचे वर्धा जिल्हाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अस्मिता मंडपे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, प्रा. पद्माकर बाविस्कर, प्रा. अरूण फाळके, सुधीर प्रकाशनचे सुधीर गवळी आदी उपस्थित होते. ग्रंथोत्सवात लावण्यात आलेल्या पुस्तकांच्या स्टॉलचे प्रा. वाकुडकर यांनी फित कापून व दीप प्रज्चलन करुन उद्घाटन केले. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी त्यांच्या आमदार निधीतून ग्रंथालयासाठी सभागृह आणि ग्रामीण भागातील ग्रंथालयांना पुस्तकांचा संच दिला. पुस्तकांच्या सानिध्यात माणूस विचारशील होतो. भावी पिढीने या पुस्तकांना आपला मित्र बनवावे असे मत संजय इंगळे तिगावकर यांनी व्यक्त करुन ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून मिळणाऱ्या मेजवाणीचा वर्धेकरांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन केले. प्रास्ताविकातून ग्रंथपाल अस्मिता मंडपे यांनी ग्रंथोत्सवाची भूमिका विशद केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी ग्रंथदिंडीने शहरात ग्रंथोत्सवाची वातावरणनिर्मिती केली. बजाज वाचनालयापासून सुरू झालेली ही ग्रंथ दिंडी वाजत गाजत ग्रंथालय कार्यालयात पोहचली. कार्यक्रमाचे संचालन सुषमा कोटेवार यांनी केले
वर्धा जिल्ह्याचे मॉडेल सर्वत्र राबवावे : भोयर
भावी पिढी विचारशील आणि प्रगल्भ व्हावी यासाठी आमदार निधीचा उपयोग पुस्तकांचा संच देण्यासाठी होत आहे. ही कृती सर्व विकासकामांपेक्षा श्रेष्ठ असून वर्धा जिल्ह्याचे हे मॉडेल सर्वत्र राबवले जायला हवे, असा आशावाद आमदार डॉ.पंकज भोयर यांनी व्यक्त केला. आमदार झाल्यावर ग्रंथालय सुसज्ज करण्याचा पहिला निर्णय घेवून येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाचन कक्ष आणि स्पर्धा परीक्षेची पुस्तके दिलीत. त्यामुळे विद्यार्थी इथे बसून अभ्यास करायला लागलेत. बोलण्यापेक्षा कृतीतून विकास घडविण्यावर माझा विश्वास आहे. आमदार निधीचा ग्रंथालयापेक्षा दुसरा चांगला उपयोग होऊच शकला नसता. हा निधी ग्रामीण भागातील भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयोगात आणता आला; याचा आनंद आहे, असेही डॉ.भोयर म्हणाले.

Web Title: Constitution of the country and gramgita for the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.