संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा हक्क दिला
By Admin | Published: September 15, 2016 01:05 AM2016-09-15T01:05:03+5:302016-09-15T01:05:03+5:30
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतावर जमीनदार व इंग्रजांचे राज्य होते. नागरिकांना मुलभूत आधिकारांवर अनेक बंधने होती.
प्रकाश कांबळे : संविधान जनजागृती व पर्यावरण प्रबोधन यात्रा
वर्धा : स्वातंत्र्यपूर्व काळात भारतावर जमीनदार व इंग्रजांचे राज्य होते. नागरिकांना मुलभूत आधिकारांवर अनेक बंधने होती. आपले विचार मांडता येत नव्हते. जाती व्यवस्थेमुळे काही घटकांना सन्मानाने जगण्याचा हक्कही नाकारला होता. पण १९५० पासून भारतीय संविधानाने देशातील अस्पृश्यता, वेठबिगारी दूर करून प्रत्यकाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी व्यक्त केले.
संविधान जनजागृती व पर्यावरण प्रबोधन यात्रा उमरी या गावापासून सुरू करण्यात आली आहे. आतापर्र्यंत २१ कार्यक्रम पार पडले आहेत. सेवाग्राम येथून यात्रेचा चौथा टप्पा सुरू करून खरांगणा गोडे, वाघोली, मदनी, करंजी काजी, करंजी भोगे अशी प्रबोधन यात्रा काढण्यात आली. यावेळी कांबळे बोलत होते.
महाराष्ट्र अंनिसच्या आणि विविध परिवर्तनवादी संघटनांच्या समन्वय समितीच्या सहकार्याने प्रा. नूतन माळवी व गजेंद्र सुरकार यांच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त संविधानाची मुल्ये, अधिकार, कर्तव्ये नागरिकांना कळावी, यासाठी संविधान जनजागृती व पर्यावरण प्रबोधन यात्रा वर्धा जिल्ह्यात काढण्यात आली आहे.
याप्रसंगी सुनील सावध, सुरेश बोरकर, पंकज सत्यकार यांनी भारतीय संविधानाची निर्मिती, वाटचाल व मिळालेले अधिकार याबाबत प्रबोधन केले. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांनी संविधानातील पर्यावरणीय घटकांचे सरंक्षण व संवर्धन याविषयी माहिती दिली. संचालन सुनील ढाले, तर आभार भरत कोकावार, भीमसेन गोटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी अॅड. कपिल गोडघाटे, अशोक वेले, अविनाश काकडे, विजय आगलावे आदींनी सहकार्य केले. संजय भगत यांनी प्रबोधन गीत सादर केले. यावेळी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)