त्रिमूर्ती नगरातील पुलाचे बांधकाम करा
By admin | Published: June 28, 2017 12:59 AM2017-06-28T00:59:47+5:302017-06-28T00:59:47+5:30
त्रिमूर्ती नगर येथील रस्त्याचे बांधकाम बऱ्याच वर्षांपासून करण्यात आले नाही. यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
युवा परिवर्तन व नागरिकांची मागणी : अनेक वर्षांपासून रस्त्याचेही बांधकाम रखडले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : त्रिमूर्ती नगर येथील रस्त्याचे बांधकाम बऱ्याच वर्षांपासून करण्यात आले नाही. यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे चिखल साचला असून अपघाताचे प्रमाण वाढत आहे. परिणामी, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय पुलावरून पाणी वाहत असल्याने रहदारी बाधित होत आहे. याकडे लक्ष देत रस्ता व पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.
नागरिकांनी आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधींना अनेकदा निवेदने दिली; पण खोट्या आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. खा. रामदास तडस यांनी २६ डिसेंबर २०१६ रोजी या कामांचे भूमिपूजन केले; पण कुठलीही कारवाई झाली आहे. मागील कित्येक वर्षांपासून रस्त्याची निर्मिती करण्यात आली नसल्याने नागरिकांना ये-जा करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळा असून दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरात चिखल साचला आहे. यामुळे वाहने घसरून अपघात होत आहेत. शिवाय पुलाचेही बांधकाम न केल्याने पुलावरून पाणी वाहते. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. अनेकदा निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
वास्तविक, नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत पावसाळ्यापूर्वीच रस्ता आणि पुलाचे बांधकाम करणे गरजेचे होते; पण कुणीही लक्ष दिले नाही. परिणामी, नागरिकांच्या समस्यांत भर पडत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत रस्ता व पुलाचे त्वरित बांधकाम करावे, अशी मागणी युवा परिवर्तन की आवाज संघटनेने केली आहे. अन्यथा खा. रामदास तडस यांच्या जनसंपर्क कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.