दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम रखडले
By Admin | Published: July 13, 2017 12:58 AM2017-07-13T00:58:34+5:302017-07-13T00:58:34+5:30
वर्धा व अमरावती या दोन्ही जिल्ह्याची सीमा असलेल्या सिरसोली-निंभारणी पुलाच्या बांधकामाचे भिजत धोंगडे गेल्या १९ वर्षांपासून शासनदरबारी पडून आहे.
सिरसोलीवासीयांना १९ वर्षांपासून प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : वर्धा व अमरावती या दोन्ही जिल्ह्याची सीमा असलेल्या सिरसोली-निंभारणी पुलाच्या बांधकामाचे भिजत धोंगडे गेल्या १९ वर्षांपासून शासनदरबारी पडून आहे. वारंवार मागणी करूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष वाघ यांनी सामाजिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदन दिले आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत सदर पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन ना. पाटील यांनी दिले. प्रत्यक्ष कार्यवाहीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. सिरसोली हे गाव आष्टी तालुक्यात तर निंबारनी गाव मोर्शी तालुक्यात येते. ही दोन्ही गावे वर्धा नदीच्या काठावर असल्याने ये-जा करणे अदचणीचे होते. परिणामी प्रवाशांना १६ कि़मी. चे जादा अंतर कापावे लागते. आदर पुलाचे बांधकाम झाल्यास चांदूरबाजार, नेरपिंगळाई, राजूरवाडी, परतवाडा, लेहगाव, आष्टी, कारंजा व नागपूर रस्त्याचे अंतर ३० ते ३५ कि़मीने कमी होईल. या परिसरात नदीवर एकही पूल नाही. त्यामुळे या पुलावरून ५ ते ६ मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरू होऊ शकते. परिसरातील शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळेल. दोन्ही गावांना जाणारी बससेवा सुरू होईल. तसेच गावकऱ्यांना कमी वेळेत ये-जा करता येईल. गेल्या १९ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबीत आहे. आजवर या मागणीची कोणीही दखल घेतली नाही. सिरसोली गाव राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम आले. अशा प्रगतशील गावाला एकही पूल देऊअ नये ही शोकांतिकाच असे मत गावकरी व्यक्त करतात. राज्य शासनाने या गावांना जोडणारा पूल बांधुन दळणवळण सुरळीत करण्याची मागणी आहे.