इमारत बांधकाम कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष
By admin | Published: May 29, 2015 01:51 AM2015-05-29T01:51:47+5:302015-05-29T01:51:47+5:30
जिल्ह्यातील आठ हजारांहुन अधिक इमारत बांधकाम कामगारांच्या मागण्या अद्यापही प्रलंबित आहे. कामगार अधिकारी नसल्याने नवीन नोंदणीही थांबली आहे.
अधिकारी नसल्याने नोंदणीसही टाळाटाळ : साहित्य खरेदीच्या धनादेशाचाही अनादर
वर्धा : जिल्ह्यातील आठ हजारांहुन अधिक इमारत बांधकाम कामगारांच्या मागण्या अद्यापही प्रलंबित आहे. कामगार अधिकारी नसल्याने नवीन नोंदणीही थांबली आहे. संबधितांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी इमारत बांधकाम कामगार संघटनेने केली आहे.
तीन महिन्यांपासून कायमस्वरूपी कामगार अधिकारी नाही. प्रभार देऊन काम चालविले जात आहे. यामुळे कामगारांची कुचंबना होत आहे. नवीन नोंदणी प्रक्रिया थांबली आहे. ३१ आॅगस्ट २०१४ पूर्वी नोंदणी केलेल्या अडीच हजारांहुन अधिक कामगारांना तीन हजार साहित्य खरेदी अनुदानाचे धनादेश दिले गेले. पैकी ३५० हुन अधिक कामगारांचे आंध्रा बँकचे चेक इमारत बांधकाम कामगार मंडळ वर्धा या खात्यात पैसे नसल्याने बाऊंस झाले. चेक बाऊंस कसे होऊ शकतात, हा प्रश्नच आहे. ३० आॅगस्ट २०१४ नंतर नोंदणी केलेल्या सर्व कामगारांना तीन हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे, नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे दोन मुलींच्या विवाहासाठी प्रत्येकी ५१ हजार रुपये अनुदान द्यावे, तत्सम सुविधा आंध्रप्रदेश, तामिळनाडू राज्यात आहे. वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या इमारत बांधकाम कामगारांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन द्या आदी मागण्या प्रलंबित आहे.
या मागण्यांकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी इमारत बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी तसेच कामगार मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री यांनाही निवेदने सादर केली आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)