उसणवार लिपिकामुळे झेडपीचा बांधकाम विभाग वादांकित? : राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताने अधिकाऱ्यांवर दबाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 04:38 PM2024-08-06T16:38:14+5:302024-08-06T16:38:55+5:30
Vardha : अधिकाऱ्यांचेही मिळतेय पाठबळ; लिपिकांच्या कार्यकाळात कोट्यवधीच्या निविदा
लोकमत न्युज नेटवर्क
वर्धा : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात मार्च एण्डिंग आणि आचारसंहितेच्या कारणाचा दाखला देत हिंगणघाट आणि समुद्रपूर पंचायत समितीतून दोन निविदा लिपिक उसणवारीवर बोलावले होते. यातील एक लिपिक आपल्या पदस्थापनेच्या ठिकाणी परत गेला; परंतु एकाने मुक्काम ठोकला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असलेल्या या लिपिकाने निविदांत सावळागोंधळ चालविल्याने बांधकाम विभाग सातत्याने वादांकित ठरत आहे. तरीही यावर कारवाई होत नसल्याने आशीर्वाद कुणाचा आणि कशासाठी? असा प्रश्न जिल्हा परिषदेत चर्चीला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात पदस्थापना असलेले दोन निविदा लिपिक आधीच कार्यरत आहे. पण, अचानक मार्च एण्डिंग आणि लोकसभा आचासंहितेचे कारण पुढे करून तात्पुरत्या स्वरूपात हिंगणघाट आणि समुद्रपूर पंचायत समितीतीतून दोन निविदा लिपिक बोलावण्यात आले होते. हा आदेश तत्कालिक प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला होता, हे विशेष. या दोन लिपिकांच्या कार्यकाळात कोट्यवधीच्या निविदा झाल्या असून त्यामध्ये तीन पंचायत समितीसह इतरही कामांचा समावेश आहे. हे दोन्ही लिपिक निविदा मॅनेज करण्यात माहिर असल्यानेच त्यांना बोलावण्यात आल्याची चर्चा आजही कायम आहे. यातील हिंगणघाट येथील लिपिक आपल्या पंचायत समितीत परत गेला. पण, समुद्रपुरातील लिपिकाने बांधकाम विभागात ठाणच मांडले. काही राजकीय पुढारी किंवा पुढाऱ्यांच्या मुलाच्या मनाप्रमाणेच निविदा व कामे देण्याचा सपाटा सुरू आहे. याकरिता अधिकाऱ्यांवरही राजकीय दबाव आणून त्यांची दिशाभूल चालविली आहे.
तात्पुरती नियुक्ती पण, मुक्काम अद्याप कायम
लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता आणि मार्च एण्डिंगमुळे अनेक विकास कामे प्रलंबित राहण्याची शक्यता असल्याचे कारण देऊन हिंगणघाट व समुद्रपूर येथील दोन निविदा लिपिक जिल्हा परिषद बांधकाम विभागाने बोलावले होते. आता मार्च एण्डिंग झालं, आचारसंहिताही संपली, मर्जीप्रमाणे कामेही कंत्राटदारांच्या पुढ्यात गेली. तरीही समुद्रपुरातील लिंपिक अद्यापही कार्यरत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पोलिस ठाण्यापर्यंतही गेला होता वाद...
- येथील या उसणवार निविदा लिपिकांच्या मनमर्जी कारभारामुळे संतापलेल्या कंत्राटदाराने भर चौकात कानशिलात लगावली होती.
- यावेळी दोन्ही लिपिक सोबतच होते, परिणामी हा वाद शहर पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. इतके होऊनही या लिपिकांशिवाय बांधकाम विभागाचे कामकाज चालतच नाही का? असाही प्रश्न आहे.
कार्यकारी अभियंत्यांचा 'नो रिस्पॉन्स'
गेल्या सहा महिन्यांपासून समुद्रपूर पंचायत समितीतील लिपिक वर्धा येथे कार्यरत असून त्यासंदर्भात विचारणा करण्यासाठी कार्यकारी अभियंता गुंडतवार यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्यांची बाजू कळू शकली नाही.
"मार्च एण्डिंग आणि लोकसभेची आचारसंहिता असल्याने बांधकाम विभागामध्ये लिपिकांची नियुक्ती केली होती, अशी माहिती आहे. परंतु त्यासंदर्भात सविस्तर काही सांगता येणार नाही, त्याची चौकशी करावी लागेल."
- सूरज गोहाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी, अधिकारी, जि.प. वर्धा.