वर्षाअखेरपर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम
By admin | Published: September 18, 2015 01:57 AM2015-09-18T01:57:43+5:302015-09-18T01:57:43+5:30
नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर शहरालगत रेल्वे फाटक क्र. १४ च्या उड्डाणपुलाचे काम पाच वर्षांपासून रखडले आहे. यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय प्रशासनाची ग्वाही
हिंगणघाट : नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर शहरालगत रेल्वे फाटक क्र. १४ च्या उड्डाणपुलाचे काम पाच वर्षांपासून रखडले आहे. यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली. या आंदोलनांचे फलित म्हणून रखडलेल्या उड्डाण पुलाचे बांधकाम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे प्रशासनाने दिली.
रखडलेल्या रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाकरिता आम आदमी पार्टीने निवेदन सादर करीत रेले रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत मध्य रेल्वेने ३१ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्यात येईल, असे एका पत्रातून कळविले आहे. नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे फाटकावर उड्डाण पुलाचे बांधकाम गत कित्येक वर्षांपासून रखडले आहे. या बांधकामाची गती अगदी संथ होती. याबाबत मध्य रेल्वेच्या मंडळ प्रबंधकांना निवेदन पाठविण्यात आले होते. यात रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पाच वर्षापासून पुलाचे बांधकाम रेंगाळल्याने दळणवळणाला मोठा फटका बसतोय. अर्धवट बांधकामाने वाहतुकीची कोंडी होत आहे. मोठी लोकवस्ती महामार्गाच्या पलीकडे आहे. यामुळे वाहनांची व पादचाऱ्यांची गर्दी तेथे असते. रेल्वेचा मार्ग व्यस्त असल्याने प्रत्येक अर्ध्या तासाने रेल्वे फाटक बंद होते. पाठपुरावा करूनही उपयोग होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले. अनेकदा आंदोलने करण्यात आली तर आपने रेल रोको करण्याचा इशारा दिला. या आंदोलनांची दखल घेत रेल्वे प्रशासनाने ३१ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली. यामुळे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे मनोज रूपारेल यांनी कळविले ओह.(शहर प्रतिनिधी)