संविधान चौक ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम तातडीने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 05:00 AM2021-06-19T05:00:00+5:302021-06-19T05:00:11+5:30
शेतकऱ्यांना यवतमाळ जिल्ह्यातील शेती वाहण्यास पोहणा, येवती या मार्गाने जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी सहन कराव्या लागत असल्यामुळे या पुलाचे बांधकाम करण्यात यावे. लाडकी ते नागरी या जिल्हा मार्गावर वणा नदीच्या पात्रापासून अरुंद असा छोटा पूल आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता या भागात तातडीने पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ना. गडकरी यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : शहराच्या मध्य भागातून वर्धा नदीवर आजनसरा नॅशनल हायवे क्रमांक ७ नागपूर-हैदराबाद मार्ग जात असून संविधान चौक (कलोडे मंगल कार्यालय) ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत केंद्र सरकारच्या सी.आर.एफ. फंडातून उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात यावे. वर्धा नदीवर आजनसरा, रोहिणी घाट, जागजई घाट, दापोली घाट, तालुका राळेगाव, जि. यवतमाळ येथे पुलाचे बांधकाम करावे, वर्धा नदीवर हिवरा, तालुका हिंगणघाट, जि. वर्धा ते धानोरा, तालुका राळेगाव, जि. यवतमाळ येथे पुलाचे बांधकाम करावे. तसेच वणा नदीवर लाडकी ते नागरी, ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथे पुलाचे बांधकाम, पोथरा नदीवर काजळसरा ते मुरदगाव, ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथे पुलाचे बांधकाम करावे आदी मागण्यांचे निवेदन माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन दिले. नागपूर - हैदराबाद महामार्ग क्रमांक ७ हिंगणघाट शहराच्या मध्य भागातून जातो. या मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात ट्रक, ट्रॅव्हल्स, खासगी गाड्या, जड वाहने २४ तास चालतात. संविधान चौक ते उपजिल्हा रुग्णालय या भागात लोकांना चौकातून येणे-जाणे करावे लागते. भरधाव वाहनामुळे या भागात अपघाताचे प्रमाण वाढले असून, लोक मृत्यूमुखी पडले आहेत. शहराच्या मध्य भागातून जाणाऱ्या नॅशनल हायवे क्रमांक सातवर संविधान चौक ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत केंद्राच्या सी. आर. एफ. फंडातून उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात यावे. आजनसरा या गावाला लागून वर्धा नदीचे पात्र आहे. या भागातील शेतकऱ्यांची शेतीसुद्धा यवतमाळ जिल्ह्यात दापोरी, रोहिणी व जागजई या भागात आहे. वर्धा नदीवर वर्धा व यवतमाळ जिल्ह्याला जोडण्यासाठी पुलाचे बांधकाम होणे गरजेचे आहे. भक्तांना ये-जा करण्यासाठी व शेतकऱ्यांना शेतीची वहिवाट करण्यासाठी वर्धा नदीच्या दापोरी घाट, रोहिणी घाट व जगजई घाट यापैकी कोणत्याही एका घाटावर पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या भक्तांना ३० ते ४० किलोमीटरचा फेरा वाचू शकतो. वर्धा नदीवरील हिवरा ते धानोरा या नदीपात्राच्या महामार्गावर शेतकऱ्यांची शेती आहे. त्यांना नदीच्या पात्रातून वहिवाट करावी लागते. नदीला पूर आल्यास अलीकडून पलीकडे जाता येत नाही. त्यामुळे शेतीच्या कामात खंड पडतो. परिणामी या सर्व शेतकऱ्यांना यवतमाळ जिल्ह्यातील शेती वाहण्यास पोहणा, येवती या मार्गाने जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी सहन कराव्या लागत असल्यामुळे या पुलाचे बांधकाम करण्यात यावे. लाडकी ते नागरी या जिल्हा मार्गावर वणा नदीच्या पात्रापासून अरुंद असा छोटा पूल आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता या भागात तातडीने पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ना. गडकरी यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.