ई-निविदा न करताच ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:23 AM2018-10-06T00:23:05+5:302018-10-06T00:23:45+5:30
देवळी तालुक्यातील गौळ येथील ग्रामपंचायत भवनाच्या बांधकामाकरिता जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करुन दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : देवळी तालुक्यातील गौळ येथील ग्रामपंचायत भवनाच्या बांधकामाकरिता जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करुन दिला आहे. पण, या ग्रामपंचायने ई-निविदा व कोणत्याही वृत्तपत्रात निविदा प्रकाशित न करताच बांधकामाला सुरुवात केली आहे, असा आरोप करीत उपसरपंच अमोल कसनारे यांनी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे.
ग्रामपंचायत भवनाच्या बांधकामाकरिता १२ लाख ५८ हजार रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून कामाला सुरुवात करण्यात आली असून हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहेत. तसेच नियमानुसार ई-निविदा प्रक्रिया व वृत्तपत्रात निविदा प्रकाशित न करताच साध्या बांधकाम साहित्याच्या निविदा करुन स्वत: सचिव व सरपंच यांनी कामाला सुरुवात केली. कामाला सुुरुवात करताना उपसरपंच व इतर सदस्यांना विश्वासात घेतले नाही. देवळीे पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता यांनी ग्रामपंचायत भवनाच्या बांधकामाला भेट दिली असता खोदण्यात आलेल्या खड्डयाची खोली कमी व त्यात पाणी आढळून आल्याचे अहवालात म्हटले. तसेच या बांधकामाकरिता लोकल रेतीचा वापर करुन नये असे अभियंत्यानी लेखी ताकीत दिल्यावरही लोकल रेतीचा वापर सुरु आहे. त्यामुळे या बांधकामासंदर्भातील ई-निविदा व बांधकामातील साहित्याची चौकशी होईस्तोवर ग्रामपंचायत भवनावे बांधकाम थांबविण्यात यावे. तसेच तात्काळ चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी उपसरपंच अमोल कसनारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.