महावितरणचा ग्राहकाला 'हाय व्होल्टेज शॉक'; घर बंद तरीही ९० हजारांचे बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 01:19 PM2022-01-04T13:19:49+5:302022-01-04T13:35:19+5:30

महावितरणने एका ग्राहकाच्या बंद घराला तब्बल ९० हजार ९०० रुपयांचे देयक थोपविल्याने ग्राहकाला हाय व्होल्टेज झटका बसला.

a consumer gets 90 thousand of power bill from msedcl for closed house | महावितरणचा ग्राहकाला 'हाय व्होल्टेज शॉक'; घर बंद तरीही ९० हजारांचे बिल

महावितरणचा ग्राहकाला 'हाय व्होल्टेज शॉक'; घर बंद तरीही ९० हजारांचे बिल

Next
ठळक मुद्देतक्रारीकडे अधिकाऱ्यांची पाठ सिंदी (मेघे)च्या उईके ले-आऊटमधील प्रकार

वर्धा : कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेल्याने विद्युत देयक माफ करण्याची प्रतीक्षा होती. परंतु माफी न मिळाल्याने ग्राहकांना दामदुप्पट देयक माथी मारल्याची ओरड झाली. आताही महावितरणकडून मनमर्जी देयक दिले जात असल्याचा प्रकार सिंदी (मेघे) येथील उईके ले-आऊटमध्ये उघडकीस आला. येथील एका ग्राहकाच्या बंद घराला तब्बल ९० हजार ९०० रुपयांचे देयक थोपविल्याने ग्राहकाला हाय व्होल्टेज  शॉक बसला.

महेंद्र मेशेकर रा. सिंदी (मेघे) यांच्या मालकीचे उईके ले-आऊटमध्ये घर असून तेथे महावितरण कंपनीचे मीटर लागले आहे. या घराला कोरोनाकाळापूर्वी ७०० ते ८०० रुपये देयक यायचे. पण, कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये वाढीव देयक आल्याने एप्रिलमध्ये महावितरणशी संपर्क करुन काही देयक अदा केले. या घरी कुणीही राहत नसल्याने या मीटरचा डिस्प्ले गेल्याने मीटर बदलून देण्याची मागणी करण्यात आली. याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने तीन महिन्यांपूर्वी ७० हजार, गेल्या महिन्यात ८० हजार तर आता या महिन्यात तब्बल ९० हजार ९०० रुपये देयक आल्याने ग्राहकाला धक्काच बसला आहे. महावितरणचे कर्मचारी कोणत्या आधारावर देयक अदा करतात, असा प्रश्नच उपस्थित होत आहे.

आता देयक भरण्याकरिता घर विकावे का?

महेंद्र मेशेकर हे पेंटिंगचे काम करतात. त्यांच्या मजुरीवर त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालतो. त्यांचे हे घर काही दिवसांपासून बंद असल्याने त्या तीन खोल्यांच्या घराचे देयक तब्बल ९० हजार ९०० रुपये आल्याने हे देयक भरणार कुठून असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी बोरगाव येथील महावितरणच्या कार्यालयाकडे यासंदर्भात तक्रार केली पण, तेथील कर्मचाऱ्यांकडून हात झटकले जात असून एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात पाठविले जात असल्याचे मेशेकर यांनी सांगितले. आता हे अव्वाच्या सव्वा देयक भरण्याकरिता घर विकण्याशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी सांगितले.

हे देयके कोणत्या नियमात..

वीज वापरानुसार महावितरणकडून देयक आकारले जाते. पण, हे घर काही दिवसांपासून बंद असताना या घरमालकाला तब्बल ९० हजार ७३० रुपयांचे देयक आकारले आहे. विशेषत: देयकावर मागील रिडींग उपलब्ध नसल्याची नोंद आहे. त्यामुळे रिडींगच नाही तर देयक आकारले कुण्या नियमाने असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: a consumer gets 90 thousand of power bill from msedcl for closed house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.