कंटेनरची दुचाकीला धडक, एक ठार, दोन जखमी
By admin | Published: January 25, 2017 12:48 AM2017-01-25T00:48:03+5:302017-01-25T00:48:03+5:30
भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले.
उड्डाण पुलावरील घटना : दुचाकीवर होते तिघे, एकाची प्रकृती चिंताजनक
पवनार : भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात येथील उड्डाणपुलावर सोमवारी रात्री उशीरा झाला. योगेश साहेबराव देवघरे (२३) रा. कोरणाडा, जि. वाशीम असे मृतकाचे तर अंकित योगेश पांडे (२१) रा. क्षीरसमुद्र ता. सेलू आणि अमित चौधरी रा. रामनगर वर्धा अशी गंभीर जखमींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, योगेश देवघरे, अंकित पांडे व अमित चौधरी हे तिघे एमएच ३२ यू ९९८९ क्रमांकाच्या दुचाकीने वडगाव येथून वर्धेकडे येत होते. दुचाकी नागपूर-वर्धा मार्गावरील पवनार शिवारात आली असता वर्धेकडून नागपूरकडे जाणाऱ्या अज्ञात कंटेनरने दुचाकीला जबर धडक दिली. अपघात होताच कंटेनर चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने योगेश देवघरे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अंकित आणि अमित, हे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. अमित चौधरी याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
माहिती मिळताच सेवाग्राम ठाण्याचे संजय कापसे व कमलाकर सोनारकर यांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेत पंचनामा केला. अंकित पांडे यांच्या तक्रारीवरून सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सेवाग्राम पोलीस करीत आहे.(वार्ताहर)
लागल्या होत्या वाहनांच्या रांगा
वर्धा-नागपूर मार्गावरील पवनार शिवारातील उड्डाणपुलाजवळ कंटेनरने दुचाकीला धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघांची एकच गर्दी झाली होती. परिणामी, वर्धा-नागपूर मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सदर अपघातामुळे वर्धा-नागपूर मार्गावरील वाहतूक काही वेळाकरिता खोळंबली होती. घटनेची माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी वासूदेव बोंदरे, कर्मचारी दिलीप किटे, मंगेश वाघाडे, विलास लाडे यांनी घटनास्थळ गाठून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.