चार ठिकाणी कंटेन्मेंट अन् बफर झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:00 AM2020-05-25T05:00:00+5:302020-05-25T05:00:29+5:30
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा, जामखुटा, रोहणा तसेच आष्टी (शहीद) या चार गांवासह त्यांच्या परिसरात केंद्र सरकारच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन कंटेन्मेंट व बफर झोन तयार करण्यात आला आहे. या परिसरात नागरिकांना घराबाहेर पडण्यास पूर्णत: प्रतिबंध असून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. बंदोबस्तामुळे या परिसरांना पोलीस छावणीचेच स्वरूप आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सुरूवातीला तब्बल दीड महिना ग्रीन झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात मागील १४ दिवसांत एकूण १२ कोरोना बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. यात वर्धा ३, वाशीम १, अमरावती चार, नवी मुंबई ३, गोरखपूर (उत्तरप्रदेश)च्या एका रुग्णाचा समावेश आहे. यापैकी वर्धा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर सध्यास्थितीत जीवंत असलेल्या ११ कोविड बाधितांवर सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे आणि सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा, जामखुटा, रोहणा तसेच आष्टी (शहीद) या चार गांवासह त्यांच्या परिसरात केंद्र सरकारच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन कंटेन्मेंट व बफर झोन तयार करण्यात आला आहे. या परिसरात नागरिकांना घराबाहेर पडण्यास पूर्णत: प्रतिबंध असून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. बंदोबस्तामुळे या परिसरांना पोलीस छावणीचेच स्वरूप आले आहे.
ठिकठिकाणी लावले सीसीटीव्ही
कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्या परिसरात केंद्र सरकारच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन कंटेन्मेंट व बफर झोन तयार करण्यात आले आहेत. या परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्याद्वारे गावांमधील प्रत्येक हालचालींवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहे.
कंटेन्मेंट झोन मध्ये १,४३७ व्यक्ती होम क्वारंटाईन
आर्वी तालुक्यातील तीन ठिकाणी क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना अंमलात आणण्यात आली आहे. या कृती योजनेतील कंटेन्मेंट झोन मध्ये सध्यास्थितीत १ हजार ४३७ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. या व्यक्तींवर आरोग्य विभाग लक्ष ठेऊन असल्याचे आर्वीच्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता झोपाटे यांनी सांगितले.
आष्टी (शहीद)
कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ असलेल्या मुंबई येथून आष्टी शहरात दाखल झालेली तरुणी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या निकट संपर्कात आलेल्या ११ व्यक्तींचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. शिवाय ज्या परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळला त्या भागात क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना अंमलात आणण्यात आली आहे.
सदर तरुणीच्या निकट संपर्कात आलेल्या ११ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते सेवाग्राम येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा प्रथम अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून हे अकराही व्यक्ती कोरोना बाधित नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
कंटेन्मेंट झोन मध्ये आष्टी शहरातील वॉर्ड क्रमांक ३, वॉर्ड क्रमांक ४, वॉर्ड क्रमांक ५, वॉर्ड क्रमांक १० चा समावेश आहे.
बफर झोन मध्ये वॉर्ड क्रमांक ६, वॉर्ड क्रमांक ८, वॉर्ड क्रमांक ११, वॉर्ड क्रमांक १२, पेठ अहमदपूर, नवीन आष्टीतील वॉर्ड क्रमांक २, वॉर्ड क्रमांक ९ चा समावेश आहे.
जामखुटा
नवी मुंबई येथून जामखुटा येथे आलेल्या एका कुटुंबातील तिघे कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त होताच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यांच्या निकट संपर्कात आलेल्या १३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे तेराही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नसल्याचा प्रथम अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. तर जामखुटा परिसरात केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना अंमलात आणण्यात आली आहे.
जामखुटा येथे आढळलेल्या तीन कोरोना रुग्णांमध्ये एका अडीच वर्षीय मुलाचा समावेश आहे.
४सदर रुग्णांच्या निकट संपर्कातील सहा व्यक्तींचे स्वॅब आरोग्य विभागाकडून प्रयोगशाळेत फेर तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून हे सहाही व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी सांगितले आहे.
कंटेन्मेंट झोन मध्ये आर्वी तालुक्यातील जामखुटा, हिवरा, हिवरा तांडा, बेल्हारा, बेल्हारा तांडा, हर्राशी, राजणी, पाचोड, चिंचोली, टिटोणा, बेढोणा, वाढोणा या गावांचा समावेश आहे.
बफर झोन मध्ये आर्वी तालुक्यातील अंबाझरी, गुमगाव, लहादेवी, पांजरा, आडेगाव तर कारंजा (घा.) तालुक्यातील धामकुंड, चोपन या गावांचा समावेश आहे.