समुद्रपूरवासीयांना दूषित पाणी
By Admin | Published: March 7, 2017 01:11 AM2017-03-07T01:11:03+5:302017-03-07T01:11:03+5:30
येथील वॉर्ड क्रमांक ८, ९, १० व १ मधील नागरिकांच्या नळांना दूषित पाणीपुरवठा होतो.
नागरिक संतप्त : नगराध्यक्षांच्या रिकाम्या खुर्चीला हार
समुद्रपूर : येथील वॉर्ड क्रमांक ८, ९, १० व १ मधील नागरिकांच्या नळांना दूषित पाणीपुरवठा होतो. त्या पाण्यात जंतु येत आहेत. तसेच पाण्याला फेस येऊन त्याचा दुर्गंधही येते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याची माहिती देण्याकरिता येथील संतप्त नागरिक नगराध्यक्षांकडे गेले असता त्या तिथे दिसून आल्या नाहीत. यामुळे संतप्त नागरिकांनी त्यांच्या रिकाम्या खूर्चीला हार घालून निषेध नोंदविला.
येथील ग्रामपंचायत नगरपंचायतीत परावर्तीत झाली. यामुळे सुविधा मिळतील अशी येथील नागरिकांची अपेक्षा होती. मात्र येथे असलेल्या असुविधांमुळे आता ग्रामपंचायतच बरी असा सूर उमटताना दिसत आहे. गावात एक ना अनेक समस्या उभ्या आहेत. त्या सोडविण्याकडे येथील पदाधिकाऱ्यांसह मुख्याधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
पाईपलाईन फुटल्याने दूषित पाणी पुरवठा
समुद्रपूर : दूषित पाणी पुरवठा होत असलेल्या वॉर्डांना पाणी पुरविणारी पाईपलाईन फुटलेली आहे. यातून रोज शेकडो लीटर पाणी वाया जाते. याच बाबतीत कित्येक तक्रारी नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना केल्या; पण संबंधित नगरसेवकांच्या व प्रशासनाच्या उदासिनतेमुळे कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. यामुळे शेवटी या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी या वॉर्डातील महिला व पुरुषांनी नगरपंचायत कार्यालय गाठले. या नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी व निवेदन स्वीकरण्याकरिता नगराध्यक्ष उपस्थित नव्हत्या. उपनगराध्यक्षांशी त्यांनी संपर्क केला असता मला यायला उशीर लागेल, मी देयकावर स्वाक्षऱ्या करू की लोकांना भेटू असे उत्तर नागरिकांना मिळाले. यामुळे नागरिकांनी जोपर्यंत नगराध्यक्ष येत नाहीत तो पर्यंत आम्ही उठनार नाही, असे म्हणत ठिय्याच दिला. अखेर संतप्त महिलांनी कंटाळून नगराध्यक्षांच्या रिकाम्या खुर्चीला हार चढवला. उपस्थित उपाध्यक्ष व पाणीपुरवठा सभापतींनी महिलांच्या प्रश्नांना मजूर मिळत नसल्याने कामांना विलंब होतो अशी सारवासारव करणारी उत्तरे दिली. यावेळी नागरिकांनी दिलेले निवेदन पाणीपुरवठा सभापती गजु राऊत व उपनगराध्यक्ष रवी झाडे यांनी स्वीकारले. निवेदनामध्ये नमूद केलेल्या गंभीर समस्यांवर वेळीच उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर आंदोलनाचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे. यावेळी हेमलता रंगारी, श्वेता मांडवकर, योगीता रंगारी, करिश्मा खोब्रागडे, रेखा रामटेके, स्नेहा रंगारी, अशोक डगवार, सूरज खोब्रागड़े, अमोल बनसोड, मोहन महाकाळकर, चेतन गजभिये, दिवाकर रंगारी, अमरिश भोयर आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
पारोधीच्या महिलांचा पाण्याकरिता तहसीलमध्ये ठिय्या
समुद्रपूर : तालुक्यातील पारोधी गावातील महिलांनी तीव्र पाणी टंचाईची समस्या सोडविण्याच्या मागणीकरिता सोमवारी तहसील कार्यालयात ठिय्या मांडला. अधिकाऱ्यांना गावात येवून समस्या सोडविण्यासाठी बाध्य केले. महिलांच्या या आंदोलनामुळे अधिकारी उद्या मंगळवारी सकाळी गावात जात पाणी टंचाईची पाहणी करणार आहेत.
आज लोकशाही दिनी पारोधी गावातील ४०-५० महिलांनी तहसील कार्यालयात जावून पाणी समस्या सोडवावी अशी हाक दिली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी समस्या मार्गी काढण्याच्या सूचना केल्याचे तहसीलदारांनी सांगितले. यावेळी माजी पं.स. सदस्याने हापसी माझ्या जागेवर असल्याचे अर्ज बीडीओ, तहसीलदार यांना दिल्याने पाणी टंचाईचा प्रश्न आणखी जटील झाल्याचा आरोप करण्यात आला.