न.प.च्या ठरावाला कंत्राटदाराचा विरोध
By admin | Published: May 9, 2017 01:01 AM2017-05-09T01:01:25+5:302017-05-09T01:01:25+5:30
ई-निविदेच्या माध्यमातून दिलेले पहिले मंजूर केलेले काम पालिकेने एका ठरावाने रद्द केले.
आज सुनावणी : जिल्हाधिकाऱ्यांकडे कलम ३०८ नुसार तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : ई-निविदेच्या माध्यमातून दिलेले पहिले मंजूर केलेले काम पालिकेने एका ठरावाने रद्द केले. यामुळे सदर कंत्राटदाराने या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. या तक्रारीवरून मंगळवारी सुनावणी होणार असून येथील नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहण्यासंदर्भात नोटीसी बजावल्या आहेत.
येथील नगर परिषदेने कंत्राटदार धर्मेंद्र बडवाईक यांना प्रभाग क्र. ३ मधील देवस्थळे ते कासांडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकामाचे काम दिले होते. याच कंत्राटदाराकडे पळसगाव मार्गावरील स्मशानभूमिच्या सौंदर्यीकरणाचे असलेले काम विहित मुदतीत पूर्ण केले नसल्याचा ठपका ठेवत दिलेले काम सर्वानुमते ठराव घेवून रद्द केले. यामुळे ठेकेदाराने महाराष्ट्र न.प. कायदा १९६५ च्या कलम ३०८ अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.
न.प. सिंदी मध्ये कंत्राटदार म्हणून धर्मेंद्र बडवाईक याची ई-निविदा सर्वात कमी दराची असल्याने त्यांना काम देण्यात आले. मात्र काही काळातच हा कंत्राट रद्द केला. असे अनेक आरोप या कंत्राटदाराने तक्रारीत केले आहे. या तक्रारीत ठेकेदाराने त्याच्यावर ठेवलेल्या ठपक्यांचे खंडण केले. काम करण्याच्या काळात रेतीचे घाट बंद असल्या कारणाने सदर कामाची मुदत वाढवून देण्याची मागणी ठेकेदाराने केली होती. सदरअर्जाच्या अनुषंगाने मुख्याधिकारी यांनी कुठलीही कार्यवाही केलेली नाही. कामास विलंब होत असल्याबाबतचा एकही नोटीस न.प. च्या वतीने कंत्राटदारास बजविण्यात आली नसल्याचे कंत्राटदाराचे म्हणणे आहे. शिवाय तारखेत खोडतोड केल्यामुळे पालिका संहितेनुसार चौकशी करून खोडतोड करणाऱ्या कर्मचाऱ्याविरूद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे.
दरम्यान ८ मार्च २०१७ रोजीच्या सर्व साधारण सभेमध्ये पालिकेत कार्यरत कंत्राटी अभियंता विजय बकाने हे आपले काम वेळेत करीत नसून त्यांचे काम असमाधानकारक असल्याने कंत्राटदारास दिलेल्या कामास बकाने यांच्या कार्यपद्धतीमुळे विलंब होत असल्याचाही आरोप करण्यात करण्यात आला. यामुळे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम काढून दुसरे कंत्राटी अभियंता राजेश झाडे यांच्याकडे सोपविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
कंत्राटदारास देण्यात आलेल्या अध्यक्षाच्या स्वाक्षरीने ठराव क्र. ८ मध्ये नमुद मजकूर आणि ठराव रजिस्टरमध्ये नमुद मजकूरात तफावात आहे. यामुळे नेमका ठराव कोणता ग्राह्य धरण्यात यावा असा प्रश्न निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सुनावणीकडे लक्ष
काम रद्द करण्याच्या ठरावावरून सिंदी (रेल्वे) नगर परिषद आणि कंत्राटदारात चांगलाच वाद झाला. या वादातून कंंत्राटदाराने त्याची तक्रार थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या वादावर चौकशी सुरू झाली असून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय निष्पन्न होते याकडे सिंदी येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे. या शहरात नगर परिषद आणि नागरिकांत नेहमीच वाद होत असल्याची चर्चा आहे.
पालिकेनी दिलेले कामे प्रत्येक ठेकेदाराने दिलेल्या मुदतीत पूर्ण करावे. कामात प्रामाणिकपणा असावा. पालिकेला आलेल्या निधीचा योग्य पद्धतीने उपयोग व्हावा, ठेकेदाराला कामात विलंब होत असल्याच्या वारंवार नोटीसाद्वारे कळविण्यात आले होते. कामात विलंब होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. विचार करून त्यानंतरही त्या ठेकेदाराला न.प. तर्फे काम देण्यात आले आहे. घेतलेला ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता.
- संगीता शेंडे, नगराध्यक्ष, सिंदी (रेल्वे)