स्वातंत्र्यलढ्यात योगदान; सैनिकांना मान- सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 05:00 AM2021-08-15T05:00:00+5:302021-08-15T05:00:52+5:30
सेवाग्राम हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रस्थान राहिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वर्धा आणि सेवाग्राममध्ये बराच काळा वास्तव्य राहिल्याने जिल्ह्याचे स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान राहिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘चले जाव’ चा नारा दिल्यानंतर देशभरात स्वातंत्र्यलढ्याची क्रांतिकारक वाटचाल सुरू झाली. देशाला इंग्रजांच्या तावडीतून सोडविण्यासाठी काहींनी तुरुंगवास भोगला, तर काहींना प्राणाची आहुती द्यावी लागली.
आनंद इंगोले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा होत आहे. हा दिवस भारतीयांना अनुभवता यावा याकरिता अनेकांनी प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानातून स्वातंत्र्यांची पहाट आपल्या नशिबी आली. या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्यांमध्ये वर्धा जिल्ह्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक आणि त्यांच्या विधवा पत्नी यांना आजही शासन प्रशासनाकडून मान-सन्मान दिला जातो. तो पुढेही कायम राहावा, याकरिता सर्वांनी प्रयत्नशील असण्याची गरज आहे.
सेवाग्राम हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रस्थान राहिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वर्धा आणि सेवाग्राममध्ये बराच काळा वास्तव्य राहिल्याने जिल्ह्याचे स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान राहिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘चले जाव’ चा नारा दिल्यानंतर देशभरात स्वातंत्र्यलढ्याची क्रांतिकारक वाटचाल सुरू झाली. देशाला इंग्रजांच्या तावडीतून सोडविण्यासाठी काहींनी तुरुंगवास भोगला, तर काहींना प्राणाची आहुती द्यावी लागली. स्वातंत्र्यानंतर या सर्व स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची शासनाने दखल घेऊन त्यांना भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ सन्मानपत्र देण्यात आले. यासोबतच त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांनी दिलेल्या लढ्यानुसार राज्य शासनाकडून दरमहा १० हजार रुपये पेन्शन तर केंद्र शासनाकडून दरमहा ३१ हजार १०० रुपये पेन्शन दिली जाते. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तर ३६ स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या विधवा पत्नी हयात आहेत. या सर्वांना शासनाच्या पेन्शन योजनेसह स्वातंत्र्यदिन आणि गणराज्यदिनी प्रशासनाकडून मान, सन्मानही दिला जातो. आज स्वातंत्र्यदिनी या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची आठवण होते क्रमप्राप्त आहे.