छतावर चाफ्याची २५ झाडे लावून तापमानाचे नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:42 AM2019-05-29T11:42:58+5:302019-05-29T11:44:41+5:30

पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते प्रा. किरण वैद्य यांनी प्रत्यक्ष कृतीतून पाणीबचत व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे.

Control of temperature by placing 25 trees on the roof | छतावर चाफ्याची २५ झाडे लावून तापमानाचे नियंत्रण

छतावर चाफ्याची २५ झाडे लावून तापमानाचे नियंत्रण

Next
ठळक मुद्देजलबचत, पर्यावरण रक्षणाचा संदेशआरोच्या ‘वेस्टेज’ क्षारयुक्त पाण्याचेही नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: उन्हाळा सुरू झाला की जलबचत, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धनाचे संदेश, पोस्ट सोशल मीडियावर फिरत असतात परंतु; प्रत्यक्षात मात्र किती व्यक्ती ते कृतीत उतरवितात, हा संशोधनाचा विषय आहे. येथील पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते प्रा. किरण वैद्य यांनी प्रत्यक्ष कृतीतून पाणीबचत व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
प्रा. वैद्य हे स्वत: स्थापत्य अभियंता असून त्यांचे स्थानिक गांधी वॉर्डात निवासस्थान आहे. त्यांनी घरातील पाण्याचा एकही थेंब वाया जाणार नाही, याचे योग्य व पुरेपूर नियोजन केले आहे.
शहरातील बहुतांश घरात शुद्ध पिण्याच्या पाण्याकरिता आरओचा उपयोग केला जात आहे. याद्वारे पाण्याचे शुद्धीकरण होऊन उर्वरित साठ टक्के क्षारयुक्त पाणी वाया जाते. हा पाण्याचा फार मोठा अपव्यय आहे. हे पाणी वाया न घालविता उपयोगाकरिता योग्य नियोजन केले आहे. ‘आरओ’तून निघणारे क्षारयुक्त पाणी वाया न जाऊ देता ते थेट स्वतंत्र पाण्याच्या टाकीत जमा करण्याची व्यवस्था केली आहे. या पाण्याचा वापर भांडीकुंडी धुण्याकरिता व कूलरकरिता केला जात आहे. त्यामुळे पाण्याची बचत होत आहे.
उन्हाळ्यात स्लॅबची घरे तापतात. त्यामुळे घरात उकाडा होतो. प्रामुख्याने शेवटच्या मजल्यावर राहणाऱ्यांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो. यावर सुद्धा प्रा. वैद्य यांनी उपाय शोधला आहे. काँक्रिट छताचे तापमान ५० टक्क्यांवर आणण्यासाठी छतावार २५ प्लास्टिक ड्रममध्ये मोठी चाफ्याची झाडे लावली आहेत. ही झाडे वर्षभरात मोठी झाल्यावर तापमान कमी होईल, असे त्यांनी सांगितले.
चाफ्याच्या खोडाचे वजन इतर झाडांच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे मोठ्या झाडात त्याचे रूपांतर झाले तरी छतावार भार येणार नाही, घेरदारपणा असल्याने जास्त सावली छतावार पडते. तसेच सुगंधित फुले असलेल्या या झाडाचे स्वत:चेही सौंदर्य आहे. त्यामुळे सर्व दृष्टीने हे झाड छतावर लावण्याकरिता योग्य आहे, असे त्यांनी सांगितले.
भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. उन्हाळ्यात विहिरी व कूपनलिकांना कोरड पडली आहे. याकरिता पावसाळ्यात पाण्याचे पुनर्भरण होणे आवश्यक आहे. प्रा. वैद्य यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून छतावरील पावसाचे पाणी कूपनलिकेत सोडण्याची व्यवस्था केली आहे. प्रा. वैद्य यांनी आपल्या निवासस्थानी पाणीबचत व पर्यावरण संवर्धनाचे योग्य नियोजन केले असून समाजापुढे प्रत्यक्ष कृतीने आदर्श ठेवला आहे.

पाणीबचत व पर्यावणार्बाबत नागरिक उदासीन
पाणीबचत व पर्यावणार्बाबत अद्याप नागरिक उदासीन आहेत, ही खंत प्रा वैद्य यांनी व्यक्त केली. पाणी बचतीचे गांभीर्य अनेक नागरिकांना कळलेले नाही. भर उन्हाळयात पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. इच्छाशक्ती असेल तर पाणीवापराचे योग्य नियोजन करून पाण्याची बचत केली जाऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. काळाची गरज ओळखून व भविष्याचा वेध घेऊन प्रत्येक नागरिकाने पाणी बचतीचा संकल्प करावा, असे आवाहन प्रा. किरण वैद्य यांनी केले आहे.

Web Title: Control of temperature by placing 25 trees on the roof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.