जादूटोणाविरोधी कायद्यासाठी नियमावली तयार करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:31 PM2017-12-25T23:31:13+5:302017-12-25T23:31:26+5:30

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या १८ वर्षांच्या संघर्षानंतर आणि हत्येनंतर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध, उच्चाटन अध्यादेश अर्थात जादूटोणा विरोधी कायदा झाला.

 Conventions should be prepared for anti-superstition legislation | जादूटोणाविरोधी कायद्यासाठी नियमावली तयार करावी

जादूटोणाविरोधी कायद्यासाठी नियमावली तयार करावी

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र अंनिसचे मंत्र्यांना निवेदनातून साकडे : प्रबोधनासाठी शासनाने साधने उपलब्ध करून देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या १८ वर्षांच्या संघर्षानंतर आणि हत्येनंतर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध, उच्चाटन अध्यादेश अर्थात जादूटोणा विरोधी कायदा झाला. या कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोणतेही मानधन न घेता माहिती द्यायला तयार आहे. यामुळे प्रबोधनासाठी झालेल्या खर्चाची चौकशी व्हावी. शासकीय समितीची पुनर्रचना करावी. या कायद्यासाठी नियमावली तयार करावी आदी मागण्या महाराष्ट्र अंनिसने लावून धरली आहे.
या मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनात नागपूर येथील विधान भवनात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, उपाध्यक्ष महादेव भुईभार, राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, स्वीय सहायक नवल पाटील आदी उपस्थित होते. जादूटोणा विरोधी यात्रा राज्यभर राबविली. आज कार्यकर्ते महाराष्ट्रभर जादूटोणा विरोधी कायद्याचे प्रबोधन मानधन वा सरकारी मदत न घेता करीत आहे; पण यावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. यामुळे महाराष्ट्र अंनिसचा पैसे घेऊन काम करण्याला विरोध असून सरकारने जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रबोधनासाठी सरकारकडे असलेली साधने उपलब्ध करून द्यावीत. समिती नि:शुल्क प्रबोधन करण्यास आग्रही आहे. सरकारी वा कोणताही फंड घेऊन कार्य करण्यास अंनिसचा विरोध आहे. लोक देणगीतून २८ वर्षे चळवळीचे कार्य अविरत चालू आहे. याबाबत सविस्तर माहिती मंत्र्यांना देण्यात आली. यावर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही ना. राजकुमार बडोले यांनी दिली. याप्रसंगी एक लाख कायद्याची सचित्र पुस्तिकेच्या अध्यादेशाचे नि:शुल्क वाटप करण्यात आले.
अंनिसच्या पुढाकाराने शेतीच्या वादातील जादूटोण्याचा प्रकार संपुष्टात
भाऊबंधकीतील वाद चारचौघात पोहोचला. त्यातच नको ते आरोप झाल्याने सामाजिक बहिष्काराची स्थिती निर्माण झाली. शेवटी पोलीस, अंनिस यांच्या पुढकारामुळे शेतीच्या वादात शिरलेला जादूटोण्याचा वाद निकाली निघाला.
सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या अखत्यारित येणाºया आष्टा गावात दिगांबर भाऊराव घुमे व त्यांचे विरोधक प्रदीप सुरेश घुमे, प्रवीण घुमे, शेखर घुमे यांचा शेती विषयक वाद होता. या वादातच एक महिला मागील तीन ते चार वर्षांपासून आजारी होती. डॉक्टरकडे नेऊनही तिला आराम मिळत नव्हता. इतरांनी सुचविल्याप्रमाणे जाणत्याकडे आजाराचे कारण पाहण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील एका बाबाने आजारी असलेल्या महिलेला जादूटोणा करण्यात आल्याचे सांगितले. त्या कारणावरून आरोप-प्रत्यारोपांना तोंड फुटले. एवढ्यावरच ते प्रकरण थांबले नाही तर गावात या प्रकरणाची चर्चा करण्यात आली.
या चर्चेचे दुष्पपरिणाम इतके गंभीर झाले की शेतात काम करायला मजूरदेखील यायला तयार नव्हते. प्रत्येक व्यक्ती संशयाच्या नजरेने पाहू लागले. यामुळे मारण्याची वा हल्ला होण्याची भीती निर्माण झाली होती. करावे काय, या विवंचनेत असलेल्यास गृहस्थाने थेट अंनिसचे गजेंद्र सुरकार यांच्याकडे धाव घेतली.
त्यांनी केलेल्या सूचनेवरून सेवाग्रामचे ठाणेदार राजू मेंढे, बीट जमादार दिलीप किटे, पोलीस कर्मचारी सुरज सयाम, आष्टा येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विजय मसराम यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक विनोद वेळे, विजय भालकर, योगेश्वर राऊत, नरेश दहिलकर, गंगाधर राऊत यांच्यासह घुमे परिवरातील दिलीप, रमेश, प्रफुल्ल, कुणाल आदींची बैठक सेवाग्राम पोलीस ठाण्यात घेण्यात आली. दोन्ही गटातील व्यक्तींना भुतबाधा वा करणी, हा प्रकार नाही, हे समजावून सांगण्यात आले. सोबतच कायद्याची भाषा ठाणेदार मेंढे यांनी सांगितली. यावरून तीन भावांनी यापुढे भावाची बदनामी करणार नाही, असे अभिवचन दिले. पोलीस व महाराष्ट्र अंनिसच्या या मध्यस्थीमुळे शेतीच्या वादात शिरलेला जादूटोणा बाहेर निघाला व पूढील अनर्थ टळला.

Web Title:  Conventions should be prepared for anti-superstition legislation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.