मोबाईलवर इंटरनेट वापराने सायबर कॅफेवर संक्रांत
By admin | Published: December 30, 2014 11:43 PM2014-12-30T23:43:15+5:302014-12-30T23:43:15+5:30
काही वर्षांपूर्वी इंटरनेटची सुविधा ही केवळ सायबर कॅफेमध्येच उपलब्ध असायची. गावखेड्यात त्याचा गंधही नव्हता. इंटरनेट चालणारे मोबाईल हे खूप महागडे असायचे. त्यामुळे सायबल कॅफेत युवकांची
वर्धा : काही वर्षांपूर्वी इंटरनेटची सुविधा ही केवळ सायबर कॅफेमध्येच उपलब्ध असायची. गावखेड्यात त्याचा गंधही नव्हता. इंटरनेट चालणारे मोबाईल हे खूप महागडे असायचे. त्यामुळे सायबल कॅफेत युवकांची नेहमीच गर्दी असायची. परंतु वर्षभरापासून जिल्ह्यातील युवकांच्या हाती दिसत असलेल्या स्मार्टफोनमुळे सायबर कॅफेवर संक्रांत आली आहे.
सध्याचे जग तंत्राज्ञानाने आणि त्यातही मोबाईलक्रांतीने भारले गेले आहे. आजचे तंत्रज्ञान उद्या जुने होत आहे. टॅबबरोबर दररोज बाजारात येणारे नवीन तंत्रज्ञान सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत मिळत आहे़ विकसित तंत्रज्ञानाच्या वस्तू वापरण्याची वृत्ती, सहज व वेगाने उपलब्ध होणारे इंटरनेटमुळे सध्या जग चांगलेच वेगवान झाले आहे़ जगभरात कोणतीही गोष्ट घडली की, त्वरित ती आपल्यापर्यंत पोहोचते़ गॅस सिलिंडरचा नंबर लावण्यापासून बिल भरणे, स्पर्धा परीक्षांचा अर्ज भरणे, सोशल मीडिया वापरण्यापर्यंतची सर्वच कामे हातातल्या मोबाईल, टॅबच्या माध्यमातून होतात़
साधारणपणे १० ते १२ वर्षांपूर्वी सायबर कॅफे या प्रकाराला सुरुवात झाली. इंटरनेटवरून कुठलीही माहिती घ्यावयाची असल्यास इंटरनेट कॅफेतच जावे लागत होते. ते ही शहरातच असल्याने ग्रामीण भागातील युवकांची तारांबळ उडायची. तसेच फेसबूक या सोशल नेटवर्किंग साईटची भुरळ पडल्याने इंटरनेट कॅफेतच युवकांचा ठिय्या असायचा. सोबतच इंटरनेट वरील गेमही खेळण्याची क्रेझ वाढली. त्यामुळे इंटरनेट कॅफेमालकांचा व्यवसाय तेजीत होता. परंतु गत दोनच वर्षात स्मार्टफोन अत्यल्प किमतीत मिळायला लागल्याने आणि त्यामध्ये इंटरनेट सहज वापरता येत असल्याने युवकांच्या खिशात इंटरनेट सामावले गेले. यामुळे साहाजिकच कॅफेकडे जात असणारी पावले थांबून आता मोबाईलवर बोटे फिरू लागली. त्यातच व्हॉट्स अॅप, हाईक, वी चॅट यासारखी खास मोबाईल साठीची संवाद साधने आल्याने स्मार्ट फोनचा वापर जिल्ह्यात अतोनात वाढला असून इंटरनेट कॅफे कमी होत आहे. केवळ शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी ग्रामीण भागात कॅफेचा उपयोग होत आहे.
(शहर प्रतिनिधी )