कॉपर-टीमुळे हॉर्मोनल सायकलवर परिणाम होत नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 12:07 PM2021-10-25T12:07:25+5:302021-10-25T12:36:09+5:30
प्रत्येक गर्भनिरोधक साधनांचे काही चांगले व वाईट परिणाम असतात. मात्र, कॉपर-टी मुळे महिलांच्या हॉर्मोनल सायकलवर कोणताही दुष्पपरिणाम होत नसल्याने हे एक सुरक्षित गर्भनिरोधक साधन मानल्या जाते. त्यामुळे, तज्ज्ञ डॉक्टर महिलांना कॉपर-टी बसवण्याचा सल्ला देतात.
वर्धा : देशात गर्भनिरोधनाच्या साधनांमध्ये कॉपर-टीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या सुरक्षित साधनामुळे गर्भधारणा पाच वर्षे पुढे ढकलण्यास मदत होत असून, सध्याच्या विज्ञान युगात त्याला वर्धा जिल्ह्यातील महिलांकडूनही पसंती दिली जात आहे. विशेष म्हणजे कॉपर-टी मुळे महिलांच्या हाॅर्मोनल सायकलवर कुठलाही परिणाम होत नसल्याने तज्ज्ञ डॉक्टर महिलांना कॉपर-टी बसवण्याचा सल्ला देतात.
प्रत्येक गर्भनिरोधक साधनांचे काही चांगले व वाईट परिणाम असतात. मात्र, कॉपर-टी मुळे महिलांच्या हॉर्मोनल सायकलवर कोणताही दुष्पपरिणाम होत नसल्याने हे एक सुरक्षित गर्भनिरोधक साधन मानल्या जाते. अनेक गर्भनिरोधक साधनांप्रमाणे कॉपर-टीमुळेदेखील अनावश्यक गर्भधारणेचा धोका नसल्याने सेक्स करताना तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला त्याचा त्रास होत नाही. इतकेच नव्हे तर कॉपर-टी बसविल्यानंतर महिलांना त्या जाड होतील असे वाटते. पण हे खरे नाही. कॉपर-टीचा आणि जाडपणाचा काहीच संबंध नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
कॉपर-टी विषयी महत्त्वाचे -
- कॉपर-टीमधील तांबे या घटकामुळे तिच्या संपर्कात येणारे शुक्राणू नष्ट होतात. त्यामुळे कॉपर-टी बसविल्यानंतर गर्भधारणा होण्याची शक्यता खूप कमी असते.
- कॉपर-टी हे साधन गर्भाशयाच्या आतील बाजूस सरकले असेल तर कदाचित गर्भधारणा होण्याची शक्यता असू शकते. यासाठीच कॉपर-टीच्या दोऱ्याला सतत हात लावू नये. जर तो दोरा सैल झाला असेल तर तातडीने नजीकच्या गायनेकॉलॉजिस्टला दाखवून त्यांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.
- कॉपर-टीच्या दोऱ्याचा त्रास होत नाही. परंतु, जर तो व्हर्जायना स्वच्छ करताना ओढण्याचा प्रयत्न केलात तर साहजिकच त्रास होऊ शकतो. विशेष म्हणजे या दोऱ्याचा महिलांच्या शरीरावर व इतर कोणत्याही गोष्टींवर विपरित परिणाम होत नाही.
- हा दोरा डॉक्टरांना कॉपर-टी योग्य ठिकाणी बसली आहे का हे तपासण्यासाठी व ती काढायची वेळ झाली आहे हे समजण्यासाठी बाहेर सोडण्यात आलेला असतो.
कॉपर-टीमुळे महिलांच्या हॉर्मोनल सायकलवर कुठलाही परिणाम होत नाही. कॉपर-टी हे सुरक्षित गर्भनिरोधक असून, महिलांकडूनही त्याला पसंती दिली जाते.
- डॉ. मनीषा नासरे, प्रसूती विभागप्रमुख, जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा