कोरोना संकटात दोन लाख लोकसंख्येचा भार ८८ डॉक्टरांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 05:00 AM2020-07-22T05:00:00+5:302020-07-22T05:00:20+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आर्वीतील डॉक्टरांना बाहेर जिल्ह्यातून येणे-जाणे करण्यास मज्जाव केल्याने ग्रामस्थ आणि शहरी भागातील नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. इमर्जन्सी रुग्ण असेल तर कोठे न्यावा? हाच बिकट प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. बाहेर जिल्ह्यात रुग्णाला न्यायचे असेल तर ईपास शिवाय नेता येत नाही. ती तयार करण्यातच बराचसा कालावधी निघून जातो.
राजेश सोळंकी।
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : तालुक्यात दोन लाखांच्या लोकसंख्येकरिता केवळ ८८ डॉक्टर आहेत. १२ हजार लोकांना केवळ एक डॉक्टर सांभाळत असल्याने आरोग्य सेवाच व्हेंटिलेवर असल्याचे चित्र आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयाचे दोन कर्मचारी बाधित झाल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून १९ जुलैपर्यंत उपजिल्हा रुग्णालय परिसर सील करून नगरपालिकेच्या शिवाजी शाळेत बाह्यरुग्ण विभाग सुरू केला होता. मात्र, तेथे जाण्यास रुग्णांना मज्जाव केल्याने उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या अनेक गरीब, गरजू रुग्णांची चांगली परवड झाली. परिणामी, खासगी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी उसळल्याचे दिसून आले.
उपजिल्हा रुग्णालय बंदच असल्याने या पाच ते सहा दिवसांत स्वॅब नमुने घेण्यात आले नसल्याची माहिती मिळाली.
सोमवारपासून उपजिल्हा रुग्णालयाची सेवा पूर्ववत सुरू झाली. आता नमुने घेणे सुरू असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेचा आढावा घेतला असता आर्वी शहराची लोकसंख्या जवळपास ५० हजार तर तालुक्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या १ लाख ४५ हजार ७४१ लोकसंख्या आहे.
शहरात ४०, ग्रामीण भागात २६, तर १२ खासगी डॉक्टर
आर्वी शहरात एकूण ४० लहान-मोठे डॉक्टर वैद्यकीय सेवा देत आहे त. तर तालुक्यातील आरोग्य केंद्रांतर्गत ग्रामीण भागात २६ डॉक्टर, तर खासगी १२ डॉक्टर वैद्यकीय सेवा देत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात १० डॉक्टर कार्यरत आहेत. एकूण ८८ डॉक्टर आर्वी शहर व तालुक्यातील दोन लाख लोक सांभाळत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आर्वीतील डॉक्टरांना बाहेर जिल्ह्यातून येणे-जाणे करण्यास मज्जाव केल्याने ग्रामस्थ आणि शहरी भागातील नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. इमर्जन्सी रुग्ण असेल तर कोठे न्यावा? हाच बिकट प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. बाहेर जिल्ह्यात रुग्णाला न्यायचे असेल तर ईपास शिवाय नेता येत नाही. ती तयार करण्यातच बराचसा कालावधी निघून जातो. त्यात रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आर्वीत दवाखाने बंद आहे. अशा संकटात नागरिक सापडले आहे.
२२२ गावे, ७४ ग्रामपंचायती
आर्वी तालुक्यातील ग्रामीण भागात २२२ गावे आहेत ७४ ग्रामपंचायती आहेत. मात्र, अपुरे डॉक्टर्स व तोकडी वैद्यकीय सेवा यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शहरातील डॉक्टरांकडे रात्री-अपरात्री धाव घ्यावी लागते.
शासनाचे आदेश आहेत. पाळावेच लागतात. यासंदर्भात भाष्य करू शकणार नाही. १४ ते १९ पर्यंत उपजिल्हा रुग्णालय बंद असल्याने स्वॅब पाठविण्यात आले नाही. मात्र २० तारखेपासून रुग्णालय सुरू झाल्याने सॅम्पल पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
- मोहन सुटे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, आर्वी.