कोरोना महामारीने माजी उपसरपंचाच्या पतीसह मुलालाही हिरावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 05:00 AM2021-05-28T05:00:00+5:302021-05-28T05:00:22+5:30

तेव्हा गावात दारूचे पाट वाहत होते. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होताना दिसली, तसेच गावातील शांतताही भंग होत असल्याने शारदा मोहिते यांनी जि.प.चे माजी सभापती मिलिंद भेंडे यांच्या पुढाकाराने गावात तेजस्विनी दारूबंदी मंडळाची स्थापना केली. दररोज सायंकाळी महिलांना घेऊन गावात फिरून दारूबंदी मोहीम राबविली. समाजकंटकांनी मंडळातील काही महिलांना मारहाण केली; पण न डगमगता गावात दारूबंदी मोहीम जोमाने रेटून गावातून दारू हद्दपार केली.

The Corona epidemic claimed the life of a former deputy governor's husband and a child | कोरोना महामारीने माजी उपसरपंचाच्या पतीसह मुलालाही हिरावले

कोरोना महामारीने माजी उपसरपंचाच्या पतीसह मुलालाही हिरावले

Next
ठळक मुद्देसकाळी पतीचा, तर सायंकाळी मुलाचा मृत्यू : तळेगाव (टा.) येथील मोहिते परिवारावर काळाचा घाला, गावात पसरली शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (टा.) : गावात उपसरपंचपदाची जबाबदारी सांभाळताच गावात दारूबंदी करून महिला व मुलींच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणाऱ्या माजी उपसरपंचाच्या परिवारावर कोरोनाच्या आडून काळाने झडप घातल्याने सर्वत्र शोककळा पसरली. सकाळी पतीचे, तर सायंकाळी मुलाचे निधन झाल्याने तळेगाव (टालाटुले) येथील मोहिते परिवाराचा आधारवडच हिरावला आहे.
तळेगाव (टा.) येथील माजी उपसरपंच शारदा मोहिते यांचे पती देवराव मोहिते व मुलगा समीर, या दोघांचाही एकाच दिवशी मृत्यू झाल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे. मोहिते हे अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांच्याकडे दोन एकर शेती आहे. शारदा मोहिते पाच वर्षांपूर्वी उपसरपंच होत्या. 
तेव्हा गावात दारूचे पाट वाहत होते. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होताना दिसली, तसेच गावातील शांतताही भंग होत असल्याने शारदा मोहिते यांनी जि.प.चे माजी सभापती मिलिंद भेंडे यांच्या पुढाकाराने गावात तेजस्विनी दारूबंदी मंडळाची स्थापना केली. दररोज सायंकाळी महिलांना घेऊन गावात फिरून दारूबंदी मोहीम राबविली. समाजकंटकांनी मंडळातील काही महिलांना मारहाण केली; पण न डगमगता गावात दारूबंदी मोहीम जोमाने रेटून गावातून दारू हद्दपार केली. शारदाबाईंना या कार्यात पती व मुलांनी मोठा आधार दिला. 
घरी केवळ दोन एकर शेती असताना त्यांनी तिन्ही मुलांना उच्चशिक्षण देऊन कुटुंब सांभाळले. पंधरा दिवसांपूर्वीच मोठ्या मुलाचा विवाह झाल्याने परिवारात सध्या आनंदाचे वातावरण होते; पण अशातच कोरोनाने घरात प्रवेश मिळविला. 
यातच पती देवराव व विवाहित मोठा मुलगा समीर याला कोरोनाची बाधा झाल्याने एकाच दिवशी सकाळी पतीचा, तर सायंकाळी मुलाचा मृत्यू झाला. 
घरातील दोन्ही कर्ते पुरुष अचानक निघून गेल्याने शारदाबाईंसह मुलगा, मुलगी, समीरची पत्नी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
 

आता कर्जाचा डोंगर सर करणार कसा?
मोठा मुलगा मृत समीर हा एम.कॉम. झाला होता, तर दुसरा मुलगा शिक्षण घेत असून, मुलगी बी.एस्सी. नर्सिंग होऊन नोकरी करीत आहे. समीरला नोकरी नसल्याने तो वडिलोपार्जित शेती करून परिवाराला हातभार लावत होता. त्यामुळे घरात सर्व सुरळीत असल्याने समीरच्या विवाह निश्चित करण्यात आला. त्यामुळे घर बांधकामासाठी कर्ज काढून ते पूर्ण केले. त्यानंतर ५ एप्रिलला समीरचा विवाह झाला; पण मोहिते परिवारातील हे चांगले दिवस नियतीला मान्य नव्हते. वडिलांसह समीरला कोरोनाची बाधा झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यासाठीही एक लाख रुपयांचे कर्ज काढावे लागले. तरीही दोघेही कुटुंबाला सोडून निघून गेले. त्यामुळे शारदाबाईंसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. आता हा कर्जाचा डोंगर फेडायचा कसा, असा प्रश्न कुटुंबीयांना पडला आहे. कुटुंबापेक्षा गावासाठी समर्पण देणाऱ्या शारदाबाईंना आता मदतीची गरज असल्याने दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेण्याचे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे. 

बावणे कुटुंबीय झाले पोरके

येथील मधुकर बावणे हे रोजमजुरी करून कुटुंंबाचा सांभाळ करायचे; पण त्यांचाही अचानक मृत्यू झाल्याने परिवार उघड्यावर आला आहे. त्यांच्या परिवारात पत्नी व लहान मुले असून, त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे याही परिवाराला आर्थिक हातभाराची गरज व्यक्त होत आहे.

 

Web Title: The Corona epidemic claimed the life of a former deputy governor's husband and a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.