Coronavirus ; कोरोनामुळे अनेकांच्या घरी लांबला पाळणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 08:58 AM2021-05-18T08:58:34+5:302021-05-18T08:58:55+5:30
Wardha news कोविड संसर्गाच्या भीतीमुळे अनेकांच्या घरी पाळणा ही लांबल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
वर्धा : नागरिकांची तोबा गर्दी कोरोना संसर्ग झपाट्याने वाढण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याने बोटावर मोजण्या इतक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न सोहळ्यांसह विविध कार्यक्रमांवर होत आहेत. विशेष म्हणजे कोविड संसर्गाच्या भीतीमुळे अनेकांच्या घरी पाळणा ही लांबल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
लग्नसोहळा म्हटला की वाजंत्री, वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत काढण्यात येणारी वरात आदी चित्र डोळ्यासमोर येते. परंतु, मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे विवाह सोहळ्यांसह धार्मिक आणि विविध कार्यक्रमांवर अटी व शर्ती लादण्यात आल्या आहेत. त्यामुळे अवघ्या काही व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नसोहळे पार पाडले जात आहेत. असे असले तरी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन सध्या राज्यात कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. या कठोर निर्बंधांच्या काळात धुमधडाक्यात होणाऱ्या लग्नसोहळ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मागील वर्षभरापासून लग्नसोहळ्यांवर नियम व अटी कायम असल्याने अनेकांची लग्नसोहळे पुढे ढकललेत. तर काहींनी मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नसोहळे उरकवले. तसेच काही नव विवाहितांनी पाळणा लांबविल्याचे वास्तव आहे.
साधेपणाने केले जातेय लग्न
कोरोना संकटामुळे ग्रामीण आणि शहरी भागात रीतसर परवानगी घेऊन अगदी साधेपणाने लग्नसोहळे केले जात आहेत. लग्नसोहळा दरम्यान नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना वधू व वर कुटुंबीयांना पोलिसांकडून दिल्या जात आहेत.
१ टक्क्याने जन्मदर वाढला
जिल्ह्यात २०१९ मध्ये १६ हजार ६८१ बालकांनी जन्म घेतला. त्यावेळी जिल्ह्याचा जन्मदर १२.४० टक्के होता. तर २०२० मध्ये जिल्ह्यात १७ हजार ७९७ बालकांनी जन्म घेतला. त्याचा जन्मदर १३.११ टक्के असल्याचे सांगण्यात आले.