कोरोनामुळे देशभरातील तीस कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 07:03 PM2021-09-09T19:03:54+5:302021-09-09T19:05:49+5:30

कोरोना कालावधीत भारतातील २९ कोटी ७० लाख विद्यार्थी घरात लॉक झाल्याचा दावा, ‘युनेस्को’च्या अहवालात करण्यात आला आहे.

Corona hinders the education of 30 crore students across the country | कोरोनामुळे देशभरातील तीस कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बाधा

कोरोनामुळे देशभरातील तीस कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बाधा

Next
ठळक मुद्दे युनेस्कोच्या अहवालातील दावाशिक्षण झाले प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ लागताच मार्च २०२० मध्ये संपूर्ण जगात टाळेबंदी लागू करण्यात आली. सध्या काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरीही शाळा आणि महाविद्यालये बंदच आहेत. या कालावधीत भारतातील २९ कोटी ७० लाख विद्यार्थी घरात लॉक झाल्याचा दावा, ‘युनेस्को’च्या अहवालात करण्यात आला आहे. ऑनलाइन शिक्षणावर भर असला तरीही याचा विपरित परिणाम या पिढीला येत्या दिवसांमध्ये जाणवणार असल्याचे शिक्षक तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. (Corona hinders the education of 30 crore students across the country)

कोरोनाला रोखण्यासाठी आणि त्यापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी देशातील शिक्षण संस्था बंद करण्यात आल्यात. त्यामुळे ‘युनिस्को’च्या अहवालानुसार एप्रिल २०२० मध्ये १८८ देशांतील १५४ कोटी विद्यार्थी घरीच बसले. भारतामध्ये १५ लाख शाळा बंद ठेवल्याने २६ कोटी विद्यार्थी आणि ८९ लाख शिक्षक घरीच आहेत. यासोबतच उच्च शिक्षणात ५० हजार शिक्षण संस्था बंद आहेत. त्यामध्ये शिक्षण घेणारे ३ कोटी ७० लाख विद्यार्थी आणि १५ लाख महाविद्यालयीन प्राध्यापक घरीच आहेत. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांवर याचा परिणाम झाला असून, ‘युनेस्को’च्या अहवालानुसार सर्वाधिक परिणाम डिसेंबर महिन्यात जास्त झाल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सरकार शाळा व महाविद्यालये बंद ठेवत असले तरी शैक्षणिकदृष्ट्या मात्र नुकसान होत आहेत. गरीब व सर्वसाधारण परिवारातील मुलांना आता पुन्हा शाळेकडे वळविण्याकरिता शिक्षकांची मोठी कसरत होणार आहे. दीड वर्षापासून मुले शाळेत गेलीच नाहीत आणि कोरोनापासून सुरक्षित ठेवून शाळा सुरू करण्याबाबत विशेष लक्षही दिले जात नसल्याने, युनिसेफनेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

राज्यातील ८१.१२ टक्के पालकांची संमती

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात राज्यातील ८१.१२ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास तयार असल्याचे मत नोंदविले आहे. राज्यातील ६ लाख ९० हजार ८२० पालकांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ५ लाख ६० हजार ८१८ पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास होकार दिला आहे. यामध्ये ३ लाख ५ हजार २४८ पालक ग्रामीण भागातील आहेत, तर ७१ हजार ९०४ पालक निमशहरी भागातील आहेत. तसेच ३ लाख १३ हजार ६६८ पालक शहरी भागातील आहेत. शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे रिकामेपणामुळे विद्यार्थी व्यसनाधीन होऊन गुन्हेगारी मार्गावर जाण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून शाळा, महाविद्यालये सुुरू करावी, अशी मागणी होत आहे.

 

कोटीच्या घरात विद्यार्थी घरी बसणे हा एक टाइम बॉम्बच आहे. शाळा व महाविद्यालये बंद असल्याने त्यांचे विद्यार्थ्यांवर होणारे परिणाम जाणवू लागले आहेत. यासंदर्भात ‘युनेस्को’च्या अहवालातही नोंद करण्यात आली आहे. शिक्षण बंद असल्याने एक पिढी धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने सर्वांगीण विचार करून शाळा व महाविद्यालये सुरू करण्याबाबत पंतप्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

-शंकरप्रसाद अग्निहोत्री, संस्थाध्यक्ष, जय महाकाली शिक्षण संस्था, वर्धा

----------------------------------------------------

Web Title: Corona hinders the education of 30 crore students across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.