तालुक्यातील फुल शेतीला ‘कोरोना’चा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 05:00 AM2020-04-06T05:00:00+5:302020-04-06T05:00:02+5:30
मार्च महिना हा फुलशेतीच्या हंगामाचा कालावधी. येथून पुढे होळी, गुढीपाडवा, रामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती आदी सणांना सुरुवात होते. तर साखरपुडा, लग्न, स्वागत समारंभ आदी मंगल सोहळेही याच कालावधीत पार पडतात. त्यामुळे फुलांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढते. परंतु, कोरोनामुळे सध्या संपूर्ण देशच लॉक डाऊन आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : अलटून पलटून वातावरणात बदल होत वादळी वाऱ्यासह येणाºया अवकाळी पावसामुळे पुर्वीच शेतकरी हवालदील झाला आहे. अशातच देश लॉक डाऊन असल्याने फुलांची मागणीही मंदावली आहे. परिणामी, जिल्ह्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. जीवाचे रान करून बहरविलेली फुल शेतीतील विविध प्रजातींची फुलांची झाडे उपटण्याची वेळ या हवालदील शेतकऱ्यांवर आली आहे.
मार्च महिना हा फुलशेतीच्या हंगामाचा कालावधी. येथून पुढे होळी, गुढीपाडवा, रामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती आदी सणांना सुरुवात होते. तर साखरपुडा, लग्न, स्वागत समारंभ आदी मंगल सोहळेही याच कालावधीत पार पडतात. त्यामुळे फुलांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढते. परंतु, कोरोनामुळे सध्या संपूर्ण देशच लॉक डाऊन आहे. शिवाय जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आली आहे.
तसेच गर्दी टाळण्यासाठी विविध धार्मिक, सांस्कृतीक, राजकीय, मंगल सोहळ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे फुलांची मागणीच नगण्य आहे. तालुक्यातील संत भोजाजी महाराज देवस्थानासह अनेक मंदिरांना टाळे लागले आहेत. परिणामी, ऐन हंगामाच्या काळात तालुक्यातील फूल व्यापारी या फुलशेतींकडे फिरकायला तयार नाही. शिवाय विदर्भातील सर्वात मोठी नागपूर येथील फुल बाजारापेठ बंद आहे. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमारीचीच वेळ आली आहे. तालुक्यातील वडनेर नजीकच्या पिपरी येथील सुनील चरडे यांची शेती आहे. त्यांनी पारंपारीक शेतीला फाटा देत यंदा फुलशेती करण्याचा निर्णय घेत तशी कृती केली. सध्या त्याची फुलशेती चांगली बहरली असली तरी बाजारपेठाच बंद असल्याने चांगलाच आर्थिक फटका त्यांना सहन करावा लागत आहे.
५० हजारांचे नुकसान
सुनील चरडे यांनी अर्ध्या एकरात फुलशेती तर उर्वरित शेतजमीनीवर इतर पिकाची लागवड केली. मध्यंतरी झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे फुलशेती वगळता इतर पीक जमिनदोस्त झाले. पण फुलशेती कायम राहिली. यातून सुमारे ५० हजार रुपयांचे उत्पन्न होईल अशी अपेक्षा त्यांना होती. परंतु, कोरोनामुळे बाजारपेठाच बंद असल्याने शेतीवर झालेला खर्चही निघणे कठीन असल्याचे शेतकरी चरडे सांगतात. फुल उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी चरडे यांनी केली आहे.