कोरोना संशयितांची पाच दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 06:00 AM2020-03-16T06:00:00+5:302020-03-16T06:00:10+5:30
दुबईहून आलेल्या पाच व्यक्तींना खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने त्यांच्या घरीच निरीक्षणात ठेवले होते. या पाच व्यक्तींचे कोरोना स्वॅप चाचणी निगेटिव्ह आली आहे. तरीही खबरदारी म्हणून त्यांना १४ दिवसांसाठी त्यांच्या घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांना सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास प्रतिबंध करण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दुबईवरून वर्धा येथे आलेल्या पाच जणांची आरोग्य प्रशासनाकडून त्यांच्या घरीच तपासणी करण्यात आली होती व त्यांना त्यांच्याच घरी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. मात्र, या व्यक्तींनी आपले व्यवसाय सुरू ठेवले होते. निरीक्षण काळात ते दुकानात जाऊन बसत होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्यांची दुकाने सील करण्याची कारवाई शनिवारी केली, अशी माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिली आहे.
दुबईहून आलेल्या पाच व्यक्तींना खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने त्यांच्या घरीच निरीक्षणात ठेवले होते. या पाच व्यक्तींचे कोरोना स्वॅप चाचणी निगेटिव्ह आली आहे. तरीही खबरदारी म्हणून त्यांना १४ दिवसांसाठी त्यांच्या घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांना सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. मात्र तरीही ती व्यक्ती त्यांचा व्यवसाय करीत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्या आस्थापना सील केल्यात. कोरोना विषाणू संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी शासन, प्रशासन विविध उपाय योजना करीत आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. यामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार करणाºया व्यक्तींवर कारवाई करण्याचे अधिकार सुद्धा आहेत. याच कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद
शासनाचे आदेश : आदेशांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई
वर्धा : राज्य शासनाने साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ राज्यात १३ मार्चपासून लागू केला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी राज्यातील मनपा, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्र तसेच महाविद्यालये आणि व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आयुक्त यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था तसेच अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले केले आहे.
राज्यात कोरोना विषाणूसंसर्गित व्यक्तींची संख्या वाढत आहे. हा संसर्ग थांबविण्यासाठी राज्य शासनाने १३ मार्च रोजी गर्दी होणारे सांस्कृतिक, सार्वजनिक, धार्मिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम घेण्यात येऊ नये, तसेच पूर्वी अशा कार्यक्रमांना परवानगी दिली असल्यास ती रद्द करण्याचा सूचना दिल्या होत्या. तसेच चित्रपटगृहे, व्यायामशाळा, नाट्यगृहे, जलतरण तलाव अशी गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्याचे आदेशसुद्धा दिले होते.
शासनाने शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गर्दी बघता आणि तिथे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून महानगर पालिका, नगरपालिका, सर्व नगर पंचायत मधील सर्व सरकारी, खासगी शाळा, तसेच अंगणवाड्या आणि महाविद्यालयेसुद्धा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, इयत्ता १० वी, १२ वी आणि विद्यापीठाच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन न करणाºयांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील तीर्थक्षेत्राच्या व्यवस्थापकांची बैठक घेऊन जिल्ह्यात होणाºया पुढील यात्रा रद्द करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे. तसेच तिर्थस्थळी दर्शनी भागात कोरोनाबाबत जनजागृती करणारे फलक लावण्यात यावेत. तिर्थस्थळाची साफसफाई आणि भाविकांसाठी हात धुण्यासाठी साबण आणि पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी शनिवारी सावंगी (मेघे) येथील रुग्णालयाला भेट देऊन तेथील क्वारंटाईन कक्षाची पाहणी केली. तसेच अत्यावश्यक सुविधांची पाहणी करून तेथील डॉक्टरांशी चर्चा केली. क्वारंटाईन कक्ष अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल वानखडे यांची नेमणूक केली आहे.