प्रशासनाला कोरोनाची धास्ती; वर्धेकर मात्र बिनधास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 05:00 AM2021-02-19T05:00:00+5:302021-02-19T05:00:42+5:30
जिल्हातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून जिल्ह्यात जमाबंदी लागू करून जिल्ह्यात कोरोना उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता ‘लोकमत’ने मुख्यबाजारपेठेसह बसस्थानक परिसराची पाहणी केली असता नियमांची बासनात गुंडाळल्याचे चित्र कायम होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या पहिल्या लाटीत राज्यात सर्वांत शेवटी असलेला वर्धा जिल्हा आता दुसऱ्या लाटीत पॉझिटिव्हीटी रेटमध्ये राज्यात दुसऱ्यास्थानी आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन तत्काळ पावले उचलून जमावबंदीचा आदेश पारित केला. तसेच कोरोनाच्या उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही केल्यात मात्र, नागरिक बिनधास्त असल्याचे दिसून येत आहे. मुख्य बाजारपेठेसह बसस्थानक परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी असून, ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्स, अशीच अवस्था असल्याने संचारबंदीचे नवे संकट उभे ठाकण्याची दाट शक्यता आहे.
जिल्हातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून जिल्ह्यात जमाबंदी लागू करून जिल्ह्यात कोरोना उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता ‘लोकमत’ने मुख्यबाजारपेठेसह बसस्थानक परिसराची पाहणी केली असता नियमांची बासनात गुंडाळल्याचे चित्र कायम होते.
शहारातील गोलबाजार, कपडालाइन, सराफा लाइन, किराणा लाइन आणि सिंधी लाइन परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होती. दुकानांमध्येही ग्राहक दाटीवाटीने उभे होते अनेकांच्या तोडाचे मास्क हनुवटीवर आलेले होते. फिजिकल डिस्टन्सिंगचा तर फज्जाच उडाला होता. दरम्यानच्या काळात दुकानदारांनीही उपाययोजना गुंडाळल्याचे दिसून येत आहे.
दुकानमालकांनाही सॅनिटायझर आणि मास्कचा विसर पडला आहे. बऱ्याच हातगाडी व्यावसायिकांनी मास्कच लावलेले नव्हते. वारंवार सूचना देऊनही नागरिक पालन करीत नसल्याने आता कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता आता जिल्हा प्रशासनाने ‘अॅक्शन’ मोडवर काम करण्याची गरज आहे.
बसस्थानक ठरणार कोरोनाकरिता ‘स्प्रेडर स्पॉट’
शिथिलतेनंतर हळूहळू महामंडळाच्या बसेस धावायला लागल्याने प्रवासीही गर्दी करायला लागले आहे. सध्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा शिक्षणासाठी शहरात येऊ लागल्याने बसस्थानकावरील गर्दी वाढायला लागली आहे. त्यातच विवाह संमारंभाचीही भर पडली आहे. मात्र, बसमधून प्रवास करताना नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे दिसून आले. बसस्थानकावरील हॅण्डवॉश, सॅनिटायझर बेपत्ता झाले असून, बसमधील प्रवासी संख्याही भरगच्च झाली आहे. बसमध्ये दाटीवाटीने प्रवास सुरू झाला असून, अनेक प्रवाशांच्या तोंडावर मास्कच दिसले नाही. इतकेच काय बचचालक-वाहकांकडूनही याला बगल दिली जात चित्र आज पहायला मिळाले. त्यामुळे बसस्थानक व बसमधील ही गर्दी कोरोनाचा फैलाव करण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे.
असे आहेत शासनाचे निर्बंध
लग्न समारंभ, लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रमात आरोग्य विषक नियम पाळले जात नसतील तर कारवाई होणार.
उपाहारगृह, हॉटेल्समध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास परवाना रद्द होऊ शकतो.
ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहाचे परवाने रद्द होणार.
कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमासाठी आता पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार.
सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्यास कारवाई होणार.
असे आहे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, त्याचे पालन करण्याची गरज
शहरासह ग्रामीण भागातही जमावबंदीचा आदेश पारीत करण्यात आला आहे. त्यामुळे पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्रे येऊ शकणार नाहीत. धार्मिक स्वरूपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका, लग्नसमारंभ आदींकरिता केवळ ५० व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल.
हॉटेल, पानटपरी, चहाची टपरी, चौपाटी इत्यादी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे तसेच निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. नागरिकांची गर्दी होत असल्याचे आणि नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यावसायिक, दुकानदार यांच्यावर कारवाई होईल.
जिल्ह्यातील सर्व धार्मिक संस्था, प्रार्थना स्थळे यांनी त्यांचे संस्थान, मस्जीद, मंदीर, चर्च व इतर धार्मिक ठिकाणीे गर्दी होणार नाही, या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. तसेच फिजिकल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करणे तसेच परिसराचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील.
सार्वजनिकस्थळी (रस्ते, बाजार, रुग्णालय, कार्यालय इ.) थुकणाऱ्यास ५०० रुपये. तर सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणाऱ्यास २०० रुपये दंड आकारला जाणार आहे. दुकानदार, विक्रेते यांनी ग्राहकांमध्ये कमीत कमी ३ फुटाचे अंतर न राखणे, विक्रेत्यांनी मार्किंग करणे यासाठी प्रति व्यक्ती २०० रुपये दंड आकारला जाईल. याचे अधिकार महसूल विभाग, पोलीस विभाग, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, नगरपालिका विभाग तसेच सहकार विभागाला देण्यात आले आहे.