CoronaVirus Live Updates : वर्धा जिल्ह्यात ४ हजार ५०० रेमडेसिवीर शिल्लक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 06:02 PM2021-05-18T18:02:00+5:302021-05-18T18:03:32+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : रेमडेसिवीरचा काळा बाजार किंवा साठा करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.
वर्धा - कोरोनाच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा जिल्ह्यात पुरेसा साठा असून प्रत्येक कोविड रुग्णालयाच्या मागणीनुसार त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन वितरित करण्यात येत आहे. रेमडेसिवीरचा काळा बाजार किंवा साठा करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. रेमडेसिवीरचा काळा बाजार आणि साठा याला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या निगराणीत रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेत.
जिल्ह्यात सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय, सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगणघाट व आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णालयात दाखल रुग्ण आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी शिफारस केल्यानुसार रेमडेसिवीर इंजेक्शन वितरण जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार ६३५ इंजेक्शन प्राप्त झाले होते त्यापैकी ६ हजार १३५ इंजेक्शन वितरित करण्यात आले असून ४ हजार ५०० इंजेक्शन शिल्लक आहेत.
असे होते वितरण
जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडे कोविड रुग्णालयाकडून त्यांच्याकडे दाखल रुग्णनिहाय रुग्णाच्या नावासाहित यादी कळवण्यात येते. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सदर यादी सत्यपित करून ती जिल्हाधिकारी यांच्याकडे शिफारस पाठविण्यात येते. जिल्हाधिकारी रेमडेसिवीर विक्रीची परवानगी असलेल्या जिल्ह्यातील एजन्सीला प्रत्येक रुग्णालयनिहाय किती इंजेक्शन वितरित करायचे याचा लेखी आदेश देतात. त्यानुसार संबंधित एजन्सी त्यांना ठरवून दिलेल्या रुग्णालयाला रेमडेसिवीरचा पुरवठा करते.
रुग्णालायतील प्राधिकृत व्यक्ती ज्या कोविड रुग्णासाठी इंजेक्शन देणार आहेत त्याचे नाव इंजेक्शनवर लिहून दिले जाते. तसेच इंजेक्शन देऊन झाल्यावर रिकाम्या बाटल्या भरारी पथकांना दाखविणे बंधनकारक केले आहे.
डॉक्टरांनी रुग्णांना रेमडेसिवीर आणण्यास सांगू नये
बाजारात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे आणि रुग्णालयात दाखल रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन द्यायचे असल्यास डॉक्टरांनी ते रुग्णांना आणण्यास सांगू नये. संबंधित रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन देणे आवश्यक वाटत असल्यास तसे जिल्हा शल्य चिकित्सक यांना कळवावे लेखी रुग्णाच्या नावासहित कळवावे, त्याची खात्री करून संबंधित रुग्णाला तसे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.