Lockdown in Vardha: बेशिस्त नागरिकांवर पवनारात कारवाई; पावती मात्र वर्धा नगरपालिकेची
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 04:53 PM2021-05-26T16:53:07+5:302021-05-26T16:53:45+5:30
विचारणा केल्यावर देतात अधिकाऱ्यांकडून फौजदारी कारवाईची धमकी दिली जात आहे.
पवनार ( वर्धा): बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासह दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यासाठी कोविड नियंत्रण पथक तयार करण्यात आले आहेत. पण पवनार शिवारात एखाद्या व्यक्तीवर कारवाई झाल्यावर चक्क वर्धा नगरपालिकेची पावती दिली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इतकेच नव्हे तर कुणी पावतीबाबत विचारणा केल्यास त्याला थेट फौजदारी कारवाईची तंबी दिली जात असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (Government officers taking action on people who break lockdown.)
वर्धा शहराशेजारी अवघ्या ७ किमी अंतरावर पवनार हे गाव असून तेथे ग्रामपंचायत कार्यरत आहे. शिवाय वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात सध्या सक्तीची संचारबंदी लागू आहे. याच संचाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कोविड नियंत्रण पथक तयार करण्यात आले आहे. कोविड नियंत्रण पथकातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून बेशिस्तांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जात आहे. पण पवनार शिवारात दंडात्मक कारवाई करणाऱ्या कोविड नियंत्रण पथकातील अधिकाऱ्यांकडून चक्क वर्धा नगरपालिकेची पावती दिली जात आहे.
दंडास पात्र ठरलेल्या व्यक्तींना देण्यात आलेल्या पावतीबाबत पवनार येथील सामाजिक कार्यकर्ते राजू लाडे यांनी पथकातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता जास्त चौकश्या करू नका, तुमच्यावर फौजदारी कारवाई करून तुम्हाला अटक करण्यात येईल, अशी तंबी देण्यात आल्याने कोविड नियंत्रण पथकातील अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.