CoronaVirus News : वर्ध्यात आढळले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; प्रशासनात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 01:49 PM2020-05-10T13:49:10+5:302020-05-10T13:49:35+5:30
एकाच दिवशी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती पुढे आल्याने दिवसरात्र प्रभावी उपाययोजना करणा-या प्रशासनात खळबळ उडाली आहे.
वर्धा : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ग्रीन झोनमध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्यातही अखेर कोरोनाचा शिरकाव झालाच. एकाच दिवशी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती पुढे आल्याने दिवसरात्र प्रभावी उपाययोजना करणा-या प्रशासनात खळबळ उडाली आहे. यात एक रुग्ण वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील आहे, तर दुसरा रुग्ण वाशिम जिल्ह्यातील आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या हिवरा (तांडा) येथील एका ३५ वर्षीय महिला मृत्युपश्चात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाले.
या महिलेला दम्याचा आजार असल्याने आर्वीतील तिने खासगी रुग्णालयासह सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले होते. ८ मे रोजी सावंगी रुग्णालयात तिचा स्त्राव नमुना तपासणीकरिता पाठविण्यात आला होता. रुग्णालयातून सुटी घेऊन गेलेल्या या महिलेचा मृत्यू झाला असून आज तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वर्धा जिल्हाही कोरोनाबाधितांच्या यादीत आला. प्रशासनाकडून तत्काळ दखल घेत हिंवरा (तांडा) हे गाव सील करण्यात आले. सोबत आर्वी येथील खासगी रुग्णालयही सील करण्यात आले असून या महिलेच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे.
तर दुसरा रुग्ण हा वाशिम जिल्ह्यातील असून तो शनिवारी सावंगी येथील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आला आहे. त्याची तपासणी केल्यानंतर तो कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता कोविड रुग्णालय असलेल्या सेवाग्राम रुग्णालयात त्याला दाखल केले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
-------------------
जिल्ह्यात आर्वी तालुक्यातील हिवरा (तांडा) या गावात एक ३५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पण, ती महिला मृत पावली असून त्या गावाचा परिसर सील केला आहे. तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचाही शोध घेतला असून अद्याप एकही व्यक्ती आढळून आला नाही. आरोग्य विभागाकडून सखोल तपासणी सुरू आहे.
डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी.