Coronavirus in Wardha; कोरोनाबाधितांचा शेतशिवारात वाढला वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 09:27 PM2021-05-08T21:27:26+5:302021-05-08T21:28:23+5:30
Wardha news सेलू तालुक्यातील अनेक गावांत कोरोनाबाधित रुग्ण गृह विलगीकरणात न राहता गावात संचार करीत आहेत. आता शेतशिवारातही त्यांची उपस्थिती असते. त्यामुळे ग्रामस्थांसोबत शेतमजुरांतही भीतीचे वातावरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेलू तालुक्यातील अनेक गावांत कोरोनाबाधित रुग्ण गृह विलगीकरणात न राहता गावात संचार करीत आहेत. आता शेतशिवारातही त्यांची उपस्थिती असते. त्यामुळे ग्रामस्थांसोबत शेतमजुरांतही भीतीचे वातावरण आहे.
अनेक गावात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यांना आरोग्य विभागाकडून गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात येतो किंवा गावपातळीवर निर्माण केलेल्या विलगीकरण कक्षात राहण्याचे सुचविण्यात येते. मात्र, ही बाधित मंडळी अरेरावी करीत गावात मुक्त संचार करतात. एवढेच नव्हे, तर आम्ही विलगीकरणात राहिलो तर गुरे-ढोरे कोण सांभाळणार, असा उलट प्रश्न केला जातो. आमच्या गुराढोरांची काळजी घेण्यासाठी तुम्ही सर्व खर्च करा, बदलीवर रोजदार ठेवा व त्याची मजुरीही तुम्ही द्याल का, असा उफराटा प्रश्न गावाच्या प्रमुखांना केला जातो. यामुळे गावात वादावादीचे प्रमाण वाढले आहे. या मंडळींकडून शेतातही मुक्त संचार सुरू झाला आहे. त्यामुळे शेतात काम करणारे मजूर, विशेषत: महिला भीतीच्या सावटाखाली आहेत. आशा सेविकांचे हे लोक ऐकत नाही. आरोग्य विभागाच्या चमूलाही जुमानत नाही. यामुळे गावात कोरोनाचा फैलाव होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे अशांवर कठोर कारवाई होण्याची गरज व्यक्त होत आहे. काही गावांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यासाठी प्राथमिक शाळेचा वापर केला जातो; मात्र त्या ठिकाणी प्रसाधनगृहाची व्यवस्था नाही. त्यामुळे काही ग्रामपंचायतींनी आता शाळेतील प्रसाधनगृह दुरुस्त करून अशा बाधित लोकांना शाळेतच गृह विलगीकरण करण्यासाठी ठेवण्याचे निश्चित केले आहे.
सेलू नगरपंचायत स्तरावर गृह विलगीकरणासाठी जागा नाही. अनेक गरीब रुग्णांच्या घरी दोन खोल्याच आहेत. त्यामुळे त्यांना घरी राहणे शक्य नाही. म्हणून नगरपंचायतीने मंगल कार्यालयाच्या इमारती ताब्यात घेऊन गृह विलगीकरण कक्ष निर्माण करावा, अशी मागणी होत आहे. नगरपंचायतीचे काम कासवगतीने सुरू असून, जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीचा पाठपुरावा केला जात नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.
———-