Coronavirus in Wardha; मासिक पाळीत लस घेता येते का? स्त्रीरोगतज्ज्ञांनी नोंदविले मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 03:48 PM2021-05-04T15:48:17+5:302021-05-04T15:48:36+5:30
Wardha news तुम्ही गर्भवती आहात, तुमची मासिक पाळी सुरू आहे, तुम्ही बाळाला स्तनपान करीत आहात, मग कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची की नाही, असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात घर करतो आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तुम्ही गर्भवती आहात, तुमची मासिक पाळी सुरू आहे, तुम्ही बाळाला स्तनपान करीत आहात, मग कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची की नाही, असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात घर करतो आहे. स्त्रीरोगतज्ज्ञांनी मासिक पाळीत लस घ्या, यामुळे कुठलाही अपाय नाही. मात्र, गर्भवती महिलांनी लस घेऊ नये, असे स्पष्ट केले आहे.
मासिक पाळीच्या काळात महिलांनी लस घ्यावी का? गर्भवतींनी लस घ्यावी का? यासंदर्भात स्त्रीरोगतज्ज्ञांशी संवाद साधला असता त्यांनी मत मांडले. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी यांना लस देण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक म्हणजे ६० पेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस देण्यात आली. त्यानंतर ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना आणि आता १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लसीकरण सुरू झाले आहे. नव्या धोरणानुसार आता १८ ते ४५ वयोगटातील स्त्री-पुरुषांना लस घेता येणार आहे.
मासिक पाळी ही नैसर्गिक बाब आहे. मासिक पाळी असली तरीसुद्धा महिलांनी कोरोनाची लस घेण्यास काही अडचण नाही. त्याच्यामध्ये कोणताही अडथळा असू नये. ज्यावेळी लस मिळाली असेल तेव्हा जरूर लस घ्या. लसीने कोणताही अपाय नसल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. गर्भवती महिलांना मात्र लस घेता येणार नाही. गर्भवती असताना अनेक प्रकारच्या लसी टाळण्यात येतात. कोरोनासाठीच्या या लसीत निष्क्रिय जिवंत विषाणू असल्यामुळे ही लस गर्भवती महिलांना देता येत नाही. गर्भधारणा होण्यापूर्वी लस घ्यायला काहीच हरकत नाही. मात्र, गर्भधारणेची ट्रीटमेंट काय आणि कशा प्रकारे सुरू आहे, याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचेही डॉक्टरांनी नमूद केले.
मासिक पाळी ही नैसर्गिक बाब आहे. या कालावधीत महिलांना रक्तस्राव, कंबर आणि पोटदुखीसारखे त्रास होतात. या काळत कोरोनाची लस घेतली तर अनेकांना तापही येतो. त्यामुळे लस आणि मासिक पाळी या दोन्हींचा त्रास महिलांना असह्य होऊ शकतो. याकरिता मासिक पाळीनंतर लस घ्यावी.
डॉ. स्मिता पावडे, स्त्रीरोगतज्ज्ञ, वर्धा.
गर्भवती महिलांनी लस घ्यावी अथवा नाही, याविषयी मार्गदर्शनात अद्याप स्पष्टता नाही. मात्र, मासिक पाळीत महिलांनी लस जरूर घ्यावी. यामुळे कोणताही अपाय नाही. सोशल मीडियावर महिलांनी मासिक पाळी काळात आणि गर्भावस्थेत लस घेण्याबाबत अनेक प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत. यावर विश्वास ठेवू नये.
-डॉ. दीप्ती श्रीवास्तव, स्त्रीरोगतज्ज्ञ, सावंगी (मेघे).
महिलांनी मासिक पाळीच्या पाच दिवस अगोदर आणि पाच दिवसनंतर कोरोना प्रतिबंधक लस घेऊ नये या व्हायरल होणाऱ्या मेसेजमुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अफवांना महिलांनी बळी पडू नये तर मासिक पाळीत अवश्य लस घ्यावी. शरीरावर या लसीचा कुठलाही परिणाम होत नाही.
-डॉ. निमा आचार्य, विभागप्रमुख, सावंगी (मेघे).
गाइडलाइन काय सांगतात...
कोरोना लस घेतल्यानंतर गर्भधारणेसाठी दोन महिन्यांनंतर नियोजन करावे. गर्भधारणेदरम्यान लसीकरण करू नये, अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटेनेने केली आहे. गर्भधारणेदरम्यान लस घेतल्यास गंभीर स्वरूपाचा धोका उद्भवू शकतो, असेदेखील नमूद केले आहे. मात्र, लस घेतल्यानंतर गर्भधारणेस विलंब करावा अशी कोणतीही शिफारस करण्यात आलेली नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. लसीकरणाचे फायदे आणि तोटे लक्षात घेऊन गर्भवती महिलांनी लस घ्यायची किंवा नाही याचा निर्णय वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्लामसलत करून घ्यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.