Coronavirus in Wardha; पालकांनो, पॉझिटिव्ह आल्यानंतर मुलाबाळांना दूर करून मोकळे होऊ नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 03:41 PM2021-05-04T15:41:53+5:302021-05-04T15:43:18+5:30
Wardha news लहान मुलेच कोरोना स्प्रेडर ठरत असल्याने ‘पालकांनो, पॉझिटिव्ह आल्यानंतर मुलाबाळांना दूर करुन मोकळे होऊ नका, त्यांना सोबतच ठेऊन त्यांचीही काळजी घ्या,’ असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे कोरोना आता घराघरांमध्ये पोहोचला आहे. घरातील एक सदस्य पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले इतरही सदस्य पॉझिटिव्ह येत आहे. अशातच आई-वडिलांपैकी कुण्या एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर घरातील लहान मुलांना बाधा होऊ नये, म्हणून शेजारी किंवा नातेवाइकांकडे पाठविले जात आहे, पण ही लहान मुलेच कोरोना स्प्रेडर ठरत असल्याने ‘पालकांनो, पॉझिटिव्ह आल्यानंतर मुलाबाळांना दूर करुन मोकळे होऊ नका, त्यांना सोबतच ठेऊन त्यांचीही काळजी घ्या,’ असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे.
कोरोनामुळे माणसच माणसापासून दूर जायला लागले, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या काळात भीतिपोटी अनेकांना माणुसकीचा विसर पडला आहे. कोरोना हा आजार इतर आजारांप्रमाणेच बरा होणारा असून, एकमेकांना आधार देऊन कोरोनावर मात करण्याची गरज आहे, पण सध्या समाजात विचित्र प्रकार घडतांना दिसून येत आहे. काही आई-वडील आपला मुलगा पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या योग्य उपचार करण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी लांब जातांना दिसत आहे, तर काही आई-वडील पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्या मुलांना कोरोनाची बाधा होऊ नये, म्हणून शेजारी, नातेवाईक किंवा आजी-आजोबांकडे पाठवित आहे. यामुळे आई-वडिलांच्या संपर्कात आल्यानंतर कालांतराने मुलांनाही संसर्ग होऊन तो आतापर्यंत काळजी घेणाऱ्या म्हाताऱ्या आजी-आजोबांसह नातेवाइकांनाही कोरोनाच्या सावटात ओढत आहे. परिणामी, मुलांवर उपचार करण्यासाठी त्यांची धावपळ उडतात. त्यामुळे पालकांनी काळजी घेऊन मुलाबाळांनाही आपल्याच सोबत ठेऊन योग्य उपचार घेण्याची गरज आहे.
तुमची काळजी इतरांसाठी ठरत आहेत संकट
पालकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि मुलांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर काळजी पोटी पालक मुलाबाळांना शेजारी, नातेवाईक किंवा आजी-आजोबांकडे ठेवतात. त्यामुळे मुलांमध्ये आई-वडिलांपासून दूर झाल्याची भावना निर्माण होऊन त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. त्यातूनच मग त्या मुलांनाही कोरोनाची बाधा होऊन ते ज्यांच्याकडे रहायला गेलेत, त्यांनाही कोरोना आजाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पालकांना कोरोनाच्या काळात मुलांप्रती असलेली ही काळजी इतरांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.
मुले पाच दिवसांनंतर येऊ शकतात पॉझिटिव्ह
घरातील एका व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांना पाच दिवसांनंतरही बाधा होण्याची शक्यता असते. आई-वडिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि मुलांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर मुले पूर्णपणे ठणठणीत आहे, असे समजून त्यांना बाधा होऊ नये म्हणून इतरत्र पाठविले जातात. पण, पाच दिवसानंतरही या मुलांचा अहवाल पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना इतरत्र पाठवून कोरोनाचा संसर्ग वाढविण्यापेक्षा घरीच ठेवणे फायदेशीर ठरणारे आहे.
आई-वडील पॉझिटिव्ह आल्यानंतर मुलांना ताप नसला, तरीही ते विनालक्षणाने कोरोनाबाधित राहू शकतात. पाच किंवा सात दिवसांनी मुलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आई-वडिलांनी स्वत:सोबतच मुलांचीही घरीच सर्व नियम पाळून काळजी घ्यावी. त्यांना इतरत्र पाठवून कोरोनाचा संसर्ग वाढविण्याला ब्रेक लावावा.
डॉ.सचिन पावडे, बालरोग तज्ज्ञ