धक्कादायक; वर्धा जिल्ह्यात ५९ रुग्णांनी मागितली कोविड रुग्णालयातून स्वत:हून सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 09:54 AM2021-04-29T09:54:12+5:302021-04-29T09:54:32+5:30
Wardha news मागील १२ महिन्यांत वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय, आर्वी आणि हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयातून तब्बल ५९ रुग्णांनी सुटी मागितल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
वर्धा : कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे कोविड रुग्णालयात साधी ऑक्सिजन खाट मिळणे कठीण झाले आहे. असे असले तरी मागील १२ महिन्यांत वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय, आर्वी आणि हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयातून तब्बल ५९ रुग्णांनी सुटी मागितल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात प्रत्येक कोविड बाधित डॉक्टराला देवाचाच दर्जा देत आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी ‘रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा’ ब्रीद वाक्याचा साजेसेच काम करीत आहे. जिल्ह्यात सध्या साडेपाच हजाराहून अधिक ॲक्टिव्ह कोविड बाधित असून कुठल्याही कोविड बाधिताचा उपचाराअभावी मृत्यू होऊ नये साठी जिल्हा प्रशासनातील महसूल व आरोग्य विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्था प्रयत्न करीत आहे. असे असले तरी मागील १२ महिन्यांच्या काळात उपचारार्थ तीन शासकीय कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या तब्बल ५९ कोविड बाधितांनी स्वत:हून सुटी मागून घेतली आहे. तशी नोंद जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने घेतली आहे.