कोरोनोचा वर्धा पॅटर्न राज्यासाठी मार्गदर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 02:05 PM2020-05-16T14:05:38+5:302020-05-16T14:05:56+5:30
कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाला अटकाव घालण्याठी काम केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजना या राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत.
प्राजक्त तनपुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाला अटकाव घालण्याठी काम केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजना या राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत. वर्धा जिल्हा प्रशासन आणि नागरिकांनी जिल्ह्याला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी केलेले कार्य कौतुकास्पद असून आणखी चांगले प्रयत्न करून कोरोनाचा प्रसार रोखावा अशा सूचना नगर विकास, आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीला आ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओम्बासे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
वर्धा जिल्ह्याचा कोविड संदर्भात आढावा घेताना ना. तनपुरे यांनी सध्या जिल्ह्यात कोरोनाचा एकही अॅक्टिव्ह रुग्ण नसल्याबाबत समाधान व्यक्त केले. बाहेर जिल्ह्यातून येणाºया जीवनावश्यक व इतर वस्तूच्या वाहनासोबत येणाऱ्या व्यक्ती जिल्ह्यातील स्थानिकांसोबत मिसळणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्याने राबवलेले अनलोडिंग वाहनतळ हे इतर जिल्ह्यांसाठीही मार्गदर्शक आहे. शिवाय इतर जिल्हा व राज्यातून येणाºया व्यक्तींसोबतच संपूर्ण घर विलगिकरण करण्याचा निर्णयही चांगला आहे. यामुळे कोरोनाला थांबविण्यास ९० टक्के आळा बसेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केले. खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बियाणे आणि खतांची टंचाई होणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांचा कापूस तात्काळ विकला जाईल यासाठी प्रभावी नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही ना. तनपुरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.