हिंगणघाटमधील नगरसेवक स्वत:च करतात वार्डाची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 11:59 AM2018-04-19T11:59:23+5:302018-04-19T11:59:33+5:30
हिंगणघाटमधील नगरसेवक प्रकाश राऊत हे अपक्ष म्हणून पालिकेचे विद्यमान सदस्य आहेत. गत कित्येक दिवसांपासून ते स्वत: हातात झाडू, फावडे घेवून शास्त्रीवार्डात नाल्या सफाईचे कार्य करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा सर्वत्र गाजावाजा झाला. मोहिमही यशस्वी झाल्यात. गाव, शहर आणि वॉर्डाची साफ सफाई झाली; परंतु आता या मोहिमेची परिस्थिती जैसे थे होत असल्याचे दिसत आहे. यावर मात करण्याकरिता शहरातील एका नगर सेवकाने आपल्या वॉर्डातील नागरिकांच्या सोयीसाठी स्वच्छतेचे कार्य स्वबळावर सुरू केले आहे. स्वत:च स्वच्छता करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम तो करीत आहे. केवळ फोटोसाठी स्वच्छता मोहिमेत सहभागी होणाऱ्यांनी या आदर्शाचा कित्ता गिरविण्या सारखा असून एक आदर्श नगरसेवक असा असावा असे म्हणायला हरकत नसावी.
प्रकाश राऊत हे अपक्ष म्हणून पालिकेचे विद्यमान सदस्य आहेत. गत कित्येक दिवसांपासून ते स्वत: हातात झाडू, फावडे घेवून शास्त्रीवार्डात नाल्या सफाईचे कार्य करीत आहेत. शासकीय स्वच्छता मोहीम झाल्यानंतर त्यांचे हे कार्य सुरूच आहे. विशेष असे की केवळ फोटो काढण्यासाठी सफाई केल्या जाते असे नाहीच. ही सेवा अनेक दिवसांपासून सातत्याने जैसे थे करण्याची गरज आहे. स्वच्छतेचे धडे घ्यावयाचे झाल्यास हे कार्य खरच प्रशंसनिय ठरते.
पालिकेची यंत्रणा असताना ही स्वच्छता या व्यक्तीस का करावी लागते हा प्रश्न निर्माण होतो. मिळालेल्या माहितीनुसार या वॉर्डात नगर पालिकेद्वारे नाल्याची स्वच्छता नियमितरित्या पूर्णत: होत नसल्याने नागरिकांना अस्वच्छतेचा दुर्गंधीचा सामना करावा लागतो. ही स्वच्छता पालिकेद्वारे नियमित होत नसल्याने गरजेच्या वेळी झाडू, फावडे घेवून नगरसेवक प्रकाश राऊत अस्वच्छता पाहून सेवा देतात. आणखी एक विशेष असे की हे ‘निवडणुका’ पाहून असे करीत तर नाही ना ? असा सवाल ही निर्माण होणे शक्य आहे. परंतु हे कार्य अलिकडेच करतात असे नव्हे तर त्यांची ही सेवा पूर्वीपासून सुरू आहे. दररोज सकाळी १०-११ वाजेपर्यंत स्वच्छतेची मोहीम स्वत: ते नियमित राबवितात.
या वार्डातील स्वच्छतेकडे लक्ष पुरविण्याचा त्यांचा माणस आहे. वॉर्डात मोठी समस्या निर्माण होणार नाही, याची ते दक्षता घेत असल्याचे ते सांगतात.
शासनाची स्वच्छता मोहीमही पालिकेद्वारे
हिंगणघाट शहरात स्वच्छता मोहीम राबविल्या गेली. मुख्याधिकाऱ्यांनी ही मोहीम पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून राबविली. नागरिकांनी सुद्धा सहकार्य केले. त्या काळात स्वच्छतेच्या सुचनांचे पालन करुन घेण्याकरिता कधी सक्ती तर दंडात्मक कारवाई केली. यातून स्वच्छते विषयी जागृती करण्यात पालिका यशस्वी ठरली. आता ही मोहीम संपली असून त्यांचे चांगले परिणामही दिसत आहेत. परंतु गत काही दिवसांपासून शहरात अस्वच्छतेची सुरूवात झाल्याचे दिसते. पुन्हा हे शहर पूर्ववत अर्थात स्वच्छता मोहीमेपुर्वीचे शहर होवू नये अशीच अपेक्षा नागरिकांची आहे.