पालिकेचा दहा कोटींचा कर थकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:39 AM2018-03-09T00:39:34+5:302018-03-09T00:39:34+5:30

मालमत्ता व पाणीपट्टी कर, दुकान गाळे तथा अन्य उत्पन्नाच्या साधनांवरच स्थानिक स्वराज्य संस्थांचा गाडा चालत असतो. शिवाय त्याच उत्पन्नातून शहराचा विकासही साधावा लागतो.

The corporation's tax of 10 crores is tiring | पालिकेचा दहा कोटींचा कर थकला

पालिकेचा दहा कोटींचा कर थकला

Next
ठळक मुद्दे३५ टक्के वसुली : २५ हजार ४९७ मालमत्तांची नोंद

आॅनलाईन लोकमत
वर्धा : मालमत्ता व पाणीपट्टी कर, दुकान गाळे तथा अन्य उत्पन्नाच्या साधनांवरच स्थानिक स्वराज्य संस्थांचा गाडा चालत असतो. शिवाय त्याच उत्पन्नातून शहराचा विकासही साधावा लागतो. यामुळे १०० टक्के कर वसुली अनिवार्य असते; पण मागील काही वर्षांपासून वर्धा नगर पालिकेच्या कर वसुलीचा टक्का पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. नागरिक कर वेळेवर भरत नसल्याने एक-दोन नव्हे तर तब्बल १० कोटी रुपयांचा कर थकला आहे. परिणामी, विकास कामांत अडथळे निर्माण होत असून शासनाकडून मिळणारा निधीही अडकत आहे.
वर्धा नगर परिषदेकडे शहरात तब्बल २५ हजार ४९७ मालमत्ता आहेत. या स्थावर व जंगम मालमत्तेतून पालिकेला प्रत्येक वर्षी सुमारे पाच कोटी रुपयांचा कर अपेक्षित आहे; पण १०० टक्के वसुली होत नसल्याने पालिकेला विकास कामांवर खर्च करताना अडचणींचा सामना करावा लागतो. मागील दोन-तीन वर्षांपासून नगर परिषदेकडून कर वसुलीची धडक मोहीम राबविली जात आहे. यातून ७० ते ८० टक्क्यांपर्यंत कर वसुली होत आहे; पण कधीही १०० टक्के वसुली झालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. मागील वर्षीही वर्धा नगर परिषदेची कर वसुली ६५ ते ७० टक्केच झाली. यामुळे नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात कर थकला आहे. मागील वर्षीपर्यंतचा तब्बल पाच कोटी रुपयांचा कर नागरिकांकडे थकित आहे. आता चालु आर्थिक वर्षाचा करही अद्याप नागरिक स्वत:हुन भरत नसल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ सर्वेक्षण तथा अन्य कामकाजांमुळे पालिकेतील अधिकारी व कर्मचाºयांना कर वसुलीकरिता कमी वेळ मिळत आहे. असे असले तरी आजपर्यंत ३५ टक्के कर वसुली झाल्याची माहिती कर अधीक्षक रवींद्र जगताप यांनी दिली. पालिकेचे कामकाज सुरळीत चालावे, शहराचा विकास व्हावा यासाठी नागरिक, व्यापाºयांनी कर वेळेवर अदा करणे गरजेचे आहे; पण शहरातील अनेक नागरिक, व्यापारी तीन-चार वर्षे पालिकेचा करच अदा करीत नसल्याचे सांगण्यात आले आहे. परिणामी, नगर परिषदेला जप्तीची कारवाई करावी लागते.
नागरिक स्वत:हुन कर अदा करीत नसल्याने मागील दोन वर्षांपासून पालिकेची धडक कर वसुली तथा जप्तीची मोहीम अव्याहत सुरू आहे. पालिकेकडून अनेक घर, दुकानांना सील लावण्यात आले आहे. यातून दंड तथा कर वसुल करण्यात आला आहे. असे असले तरी नागरिक, व्यापारी कर भरण्यात पुढाकार घेत नसल्याने पालिकेला उद्दिष्ट पूर्ण करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
...तर विकास कामांना मिळेल चालना
शहरातून पालिकेला दरवर्षी पाच कोटी रुपयांचा कर येतो. १०० टक्के वसुली झाली तरी शहरातील विकास कामांना चालना देणे शक्य होते; पण नागरिक पुढाकार घेऊन कर अदा करीत नसल्याने पालिकेला आर्थिक टंचाईला सामोर जावे लागते. सध्या पालिकेचा १० कोटी रुपयांचा कर थकित आहे. यामुळे शहरातील विकास कामे करताना अडथळे येत आहेत. शिवाय शासनाकडून निधी मिळण्यातही अडचणी येत आहेत.
दुकानासह चार घरांची केली जप्ती
पालिकेने मालमत्ता जप्तीच्या कारवाईस प्रारंभ केला. कर देयक व नोटीस देऊनही कराचा भरणा न केल्याने जप्तीचे अधिपत्र काढून बुधवारी वॉर्ड क्र ३७ हिंदनगर येथील नामेदव बाजीराव सुटे यांचे घर, वॉर्ड क्र. ६ सुदामपुरी येथील दुर्गाबाई मारोतराव मिसाळ यांचे दुकान, वॉर्ड क्र. ११ केळकरवाडी येथील उषा दिलीप तिवारी यांचे घर, वॉर्ड क्र. ३२ दयालनगर चांदीबाई गुरूदासमल लालवाणी यांचे घर, वॉर्ड क्र. ११ केळकरवाडी येथील वसंतराव शंकरराव वैद्य यांचे घर या मालमत्ता सील करीत जप्तीची कार्यवाही केली. पथकात पथक प्रमुख रवींद्र जगताप, अविनाश मरघडे, मुक्कीम शेख, प्रदीप मुनघाटे, आशिष गायकवाड, चंदन महत्वाने आदींचा समावेश आहे.

नगर पालिकेला १०० टक्के कर वसूल झाल्यास ५ कोटी रुपये मिळतात; पण नागरिक वेळेवर कर अदा करीत नाहीत. यामुळे यंदा १० कोटी रुपयांचा कर थकित झाला आहे. धडक कर वसुली मोहीम सातत्याने सुरू आहे. ही कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन कर अदा केला पाहिजे.
- रवींद्र जगताप, कर अधीक्षक, नगर परिषद, वर्धा.

शहरातील विकास कामे करण्याकरिता तथा शासनाकडून निधी मिळविण्यासाठी कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे गरजेचे असते; पण १०० टक्के वसुली होत नसल्याने विकास कामांत अडथळे येतात. नागरिकांनी ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे.
- अतुल तराळे, नगराध्यक्ष, न.प. वर्धा.

Web Title: The corporation's tax of 10 crores is tiring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.