पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला नगरसेवकांनी लावले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 11:28 PM2018-04-02T23:28:35+5:302018-04-02T23:28:35+5:30
स्थानिक नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला सोमवारी संतप्त नगरसेवकांनी कुलूप लाऊन आपला रोष व्यक्त केला. यामुळे शहरातील पाणी पुरवठा प्रभावित झाला असून यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : स्थानिक नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला सोमवारी संतप्त नगरसेवकांनी कुलूप लाऊन आपला रोष व्यक्त केला. यामुळे शहरातील पाणी पुरवठा प्रभावित झाला असून यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
गत अनेक दिवसांपासून शहरातील अनेक प्रभागात पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. तसेच स्मशानभूमीत पिण्याच्या पाण्याची भयंकर समस्या आहे. जनतेच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतल्या जात नाही. यामुळे भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक अंकुश ठाकूर, सोनू गवळी, राकाचे गटनेते सौरभ तिमांडे, धंनजय बकाने, प्रकाश राऊत, या नगरसेवकांनी दुपारी ११ वाजता नपाच्या आवारातील पाणी पुरवठा विभागाला कुलूप लावले. त्यामुळे या विभागाचे सर्व कर्मचारी कार्यालयाचे बाहेर उभे होते. या संतप्त नगरसेवकानी त्यानंतर नप अध्यक्ष प्रेम बसंतांनी यांची भेट घेतली; परंतु नगरसेवकांची नाराजी दूर झाली नाही. सदर वृत्त लिहेपर्यंत पाणी पुरवठा कार्यालयाचे कुलूप उघडण्यात आले नव्हते. यामुळे शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागल्याचे वास्तव आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत असल्याने पालिकेनी ही समस्या तत्काळ मार्गी काढावी अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे. याकडे नराध्यक्षांनी लक्ष देत तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रशासन चालविणे ही मुख्याधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. काही कर्मचारी वर्गाच्या बदल्या केल्यामुळे काही नगरसेवक नाराज झाले आहे. शहरातील जनतेला पाण्याबाबत होत असलेला त्रास लवकरच दूर होईल व त्याबाबत योग्य नियोजन सुरू आहे.
- प्रेम बसंतांनी, नगराध्यक्ष