पुलगाव बॅरेज प्रकल्पाचा खर्च ३०० कोटींवर

By Admin | Published: June 15, 2017 12:44 AM2017-06-15T00:44:02+5:302017-06-15T00:44:02+5:30

आशिया खंडातील सर्वात मोठ्या दारूगोळा भंडारासह स्थानिक कॉटन मिल, पुलगाव शहर तसेच परिसरातील १३ गावाना निम्न वर्धा प्रकल्पातून

The cost of the Pulgaon Barrage project is 300 Crore | पुलगाव बॅरेज प्रकल्पाचा खर्च ३०० कोटींवर

पुलगाव बॅरेज प्रकल्पाचा खर्च ३०० कोटींवर

googlenewsNext

अनेक कामे अपूर्णच : पूर्वी होता ९६ कोटीचा खर्च अपेक्षित
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : आशिया खंडातील सर्वात मोठ्या दारूगोळा भंडारासह स्थानिक कॉटन मिल, पुलगाव शहर तसेच परिसरातील १३ गावाना निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने शहराच्या सिमेवरील वर्धा नदीवर पुलगाव बॅरेज प्रकल्प तयार करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. या विकास कामाची सुरूवात ९ मे २०१० रोजी करण्यात आली. मार्च २०१२ पर्यंत हे काम पूर्ण होणे क्रमप्राप्त होते. परंतु, २०१७ मधील मार्च महिना उलटला तरी सदर काम पूर्ण झालेले नाही.
सन १९७५ मध्ये ३१ लाखांच्या कोल्हापूरी बंधारे बांधण्याऐवजी ९६ कोटीचा पुलगाव बॅरेज प्रकल्प पुढे आला. मध्यंतरी निधी अभावी बॅरेजचे काम रखडले होते. आज या बॅरेजच्या बांधकामाचा खर्च ३०० कोटीवर गेला आहे. परंतु, अद्यापही अनेक कामे अपूर्णच आहे. सप्टेंबर २००९ मध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पुलगाव बॅरेजचे प्रतिकात्मक भूमीपूजन करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र या बॅरेजच्या कामाचे भूमीपूजन ९ मे २०१० रोजी करण्यात आले. साधारणत: उन्हाळ्यात नदीचे पात्र कोरडे असते. त्यामुळे बॅरेजचे बांधकाम करणे सोयीचे असते; पण सात वर्षे पूर्ण होवूनही या बॅरेजचे काम नदीच्या पात्रात जमीनीपासून दोन-तीन फुटाचे वर झालेले नाही. १९७७ मध्ये पुलगाव नाचणगाव पाणी पुरवठा योजना सुरू झाली. नाचणगाव गुंजखेडी आदी पाणी पुरवठा योजनेचा विचार करून सन १९८० मध्ये वर्धा नदीवर ३१ लाख खर्चाचा कोल्हापूरी बंधारा बांधण्याचा प्रश्न शासन दरबारी रेटण्यात आला. शहरातील प्रमुख उद्योग संस्था पाण्याचा अधिक वापर करीत असल्याने त्यांच्याकडून १० टक्के राशी वसूल करून लोकसहभागातून हे काम जलसिंचन विभागाकडून करावे व उर्वरीत राशी गरजेनुसार भरल्या जावी असे ठरल्यानंतर या बंधाऱ्याच्या कामाला गती मिळालेली नाही. एका बैठकीत ३१ लाखाच्या अपेक्षित कोल्हापूरी बंधाऱ्याचा आराखडा तयार करण्यात आला. पाण्याचा उपभोग घेणाऱ्या संस्थांकडून प्रकल्पासाठी २६ लाख ४० हजार गोळा करण्याचे ठरले. पण, शासनाच्या लालफीतशाहीच्या धोरणात १९८८ मध्ये ठरलेली २८ लाखाची योजना १९९१ मध्ये ३१ लाखांवर गेली. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांची या प्रकल्पासाठी ८ एप्रिल १९९२ मध्ये नगर प्रशासनाला ५ लाखाचा निधी दिल्याचेही सांगण्यात आले. मात्र, १९९१-९२ मधील सीएसआर दर पत्रकानुसार हे काम ३१ लाखाहून ७४ लाख ८० हजारावर गेले आणि हा कोल्हापूरी बंधारा राजकीय भोवऱ्यात अडकला. शहर व परिसरातील पाणी टंचाईचा प्रश्न विचारात घेता कोल्हापूरी बंधाऱ्याचा प्रश्न मागे पडून वर्धा नदीवर ८५ कोटीचा पुलगाव बॅरेज व ९४ कोटीचे खर्डा बॅरेजची योजना कार्यान्वित झाली. बॅरेजचे काम मार्च २०१२ पर्र्यंत पूर्ण होत शहरासह परिसरातील १३ गावाचा पाणी प्रश्न सुटणे क्रमप्राप्त होते. २०१२ संपले तरी कामाला गती मिळाली नाही. संबंधीत कंस्ट्रक्शन कंपनीने २५ कोटी रूपये खर्चाची कामे पूर्ण केली. पण, सदर कंस्ट्रक्शन कंपनीला कामापोटी पैसे न मिळाल्याने हे काम बंद पडले. या बॅरेजची एकूण क्षमता १०.८० द.ल.घ.मी. असून उपयुक्त साठा ९.८४ द.ल.घ.मी. आहे. त्यामुळे दारूगोळा भांडारासह शहर व परिसरातील १३ गावांना बॅरेजमधून अतिरिक्त ३२३६ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. बॅरेजची लांबी २२५ मीटर असून १४.१७ मीटर उंची, ६.५० मीटर रूंदी राहणार असल्याचे सांगण्यात येते. यात ६५० मीटर पाणी राहणार आहे. तसेच १०.८० द.ल.घ.मी. पाणी साठविण्याची क्षमता राहणार आहे. अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी १२ बाय ६ फुटाचे १५ दरवाजे राहणार आहे. मागील ७ वर्षात या बॅरेजचे काम पाहिजे तसे भरीव न झाल्यामुळे हे बॅरेज किती वर्षात पूर्ण होणार असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. ८५ कोटीचे काम १०० कोटींवर आणि १०० कोटींचे काम ३०० कोटींवर गेले तरीही काम अपूर्ण असल्याने तात्काळ दखल घेण्याची गरज आहे.

दोन वेळा झाले भूमिपूजन
सप्टेंबर २००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पुलगाव बॅरेजचे प्रतिकात्मक भूमीपूजन करण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात या बॅरेजच्या कामाचे भूमीपूजन ९ मे २०१० ला झाले.
पुलगाव बॅरेजचे काम मार्च २०१२ पर्र्यंत पूर्ण होऊन शहर व नजीकच्या १३ गावाचा पाण्याचा प्रश्न सुटणे अपेक्षीत होते. २०१२ अरेखपर्यंत कामाला गती मिळाली नाही. कंस्ट्रक्शन कंपनीने २५ कोटीच्या खर्चाची कामे केली. परंतु, कंस्ट्रक्शन कंपनीला पैसे न देण्यात आल्याने काम बंद पडले.
सदर बॅरेजची एकूण क्षमता १०.८० द.ल.घ.मी. आहे. उपयुक्त साठा ९.८४ द.ल.घ.मी. असल्याने दारूगोळा भांडारासह शहर व परिसरातील १३ गावांना बॅरेजमधून पाणी पुरवठा होत ३२३६ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.
या बॅरेजची लांबी २२५ मीटर, उंची १४.१७ मीटर व रुंदी ६.५० मीटर राहणार असल्याने त्यात १०.८० द.ल.घ.मी. पाणी साठणार आहे. अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी १५ दरवाजे राहणार आहेत.

 

Web Title: The cost of the Pulgaon Barrage project is 300 Crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.