सेवाग्राम आश्रमात कापूस ते कापड उपक्रम
By admin | Published: February 6, 2017 01:01 AM2017-02-06T01:01:54+5:302017-02-06T01:01:54+5:30
महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमात सूतकताई होत होती; मात्र त्यापासून कापड निर्माण करण्याकरिता ते सूत बाहेर पाठवावे लागत होते.
बापूकुटीत आतापर्यंत होत होती सूतकताई
दिलीप चव्हाण सेवाग्राम
महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमात सूतकताई होत होती; मात्र त्यापासून कापड निर्माण करण्याकरिता ते सूत बाहेर पाठवावे लागत होते. आता तसे होणार नाही. महात्मा गांधी यांचा मुख्य उद्देश येथे आता साध्य होणार आहे. आश्रमात सूतकताईसह विणाईच्या कार्याचा प्रारंभ होणार आहे. तसे एक युनिट आश्रमात निर्माण करण्यात आले आहे. येथे लवकरच कापूस ते कपडा हा उपक्रम सुरू होणार आहे.
सेवाग्राम आश्रमात येणारा कार्यकर्ता नित्यनियमाप्रमाणे सूतकताई करतो. शिवाय येथे गांधी जयंती व पुण्यतिथीनिमित्त अखंड सूत्रयज्ञ सुरू असतो. आश्रमातील महादेवभाई कुटीमध्ये अंबर चरख्याचे युनिट सुरू करण्यात आलेले आहे. येथे सहा ते आठ बॉबीनचे अंबर चरखे असून ते गावातीलच स्त्री व पुरुष चालवायला येतात. यामुळे रोजगाराची हमी व संधी मिळाली. तसेच आदिनिवासमध्ये दोन व सहा बॉबीनचा चरखा मार्गदर्शिका चालवितात. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात सूत निर्माण होते. एवढे सूत येथे तयार होत असताना त्यापासून कापड निर्मिती करीता कुणीही पुढाकार घेतला नाही.
येथे तयार होणारं सूत नालवाडी येथे विणाईसाठी पाठवून कपडा तयार करण्यात येत होता. याचा उपयोग विक्री तसेच आश्रमात राहणाऱ्यांकरिता उपयोगात आणल्या जाण्याची पध्दती होती. आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर व मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांनी गांधीजींच्या ग्रामोद्यागातील कार्य आश्रमात व्हावे यासाठी सूत कताई आणि विणाईसाठी धडपड सुरू केली. त्यांच्या धडपडीला यश आले. विणाईसाठी आवश्यक करघा आणि अन्य यंत्राची निर्मिती येथे करण्यात आली आहे. या कामाकरिता बॉबीन्स भरण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
या कामाकरिता सेलू येथील अनुभवी रमेश पवनारकर व रामभाऊ बोकडे या दोन व्यक्तींची प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली. दोघेही संगीता बारई व सविता ढोबळे या दोन महिलांना या कामाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. विणाईच्या कामाकरिता दोनशे बॉबीन्स भरणे आवध्यक आहे. या दोनशे बॉबीन्स भरल्यानंतर दोन हजार मिटरचा ताना बनतो. यानंतरच त्या बॉबीन्स करघ्यावर लावून विणाईचे काम सुरू केल्या जाते.
आश्रमातच सूतकताई ते विणाई असे काम होत असल्याने गांधीजींच्या कार्याची आणि अर्थशास्त्राला जवळून पाहण्याची व ती समजून घेण्याची संधी पर्यटक व दर्शनार्थींना मिळणार आहे. हिच खरी उपलब्धी बापूंच्या ग्रामीण अर्थशास्त्राला रुजविण्याची ठरणारी असल्याच्या प्रतीक्रिया आश्रमातून मिळत आहेत. या उपक्रमाच्या प्रारंभाकडे अनेकांचे लक्ष आहे.