तज्ज्ञांचा अंदाज चुकल्याने कापूस उत्पादकांना फटका; अजूनही पाढरं सोनं शेतकऱ्यांच्या घरातच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 10:54 AM2023-04-11T10:54:17+5:302023-04-11T10:54:43+5:30
भाववाढीची प्रतीक्षा कायम
फनिंद्र रघाटाटे
रोहणा (वर्धा) : यावर्षी देशात ३६० लाख गाठी बांधता येईल इतके कापसाचे उत्पादन होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला होता. अतिवृष्टी व महापुरामुळे जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर हा अंदाज ३४० लाख गाठीपर्यंत आला. उत्पादनामध्ये घट झाल्याने बाजारपेठेत आवक मंदावल्याने बाजारभाव कायम राहण्याऐवजी तो गडगडला. अद्यापही कापसाचे भाव कमी असून, उत्पादक भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत.
त्यामुळे अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात कापूस साठवून आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत बाजारात १४५ लाख गाठी बांधता येईल एवढा कापूस बाजारात आला होता. आता भाव वाढेल की नाही, याची काहीही शाश्वती नसल्याने आर्थिक अडचणीमुळे मार्च महिन्यात शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कापूस विकला. परिणामी मार्च महिन्यामध्ये १०० लाख गाठी बांधता येईल, एवढा कापूस बाजारात आला. यावरून आतापर्यंत २४५ लाख गाठींचा कापूस बाजारात आल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांकडे अद्यापही २० टक्के कापूस शिल्लक आहे. व्यापारी किंवा तज्ज्ञ काहीही अंदाज बांधत असले तरी ५० लाख गाठींचा कापूस शेतकऱ्यांच्या घरातच आहे. आता शेतकऱ्यांची साठवणूक क्षमता संपली असून तो कापूस बाजारात आला तर शेवटपर्यंत ३०० लाख गाठींचाच कापूस उत्पादित होईल. यापेक्षा जास्त कापूस बाजारपेठेत येऊच शकणार नाही. यावरून व्यापारी धार्जिण्या तज्ज्ञांनी सुरुवातीला व आतापर्यंत व्यक्त केलेला अंदाज खोटा आणि फसवा ठरल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याचे मत व्यक्त होत आहे.
भाव वाढणार, पण कापूस व्यापाऱ्यांकडे गेल्यानंतरच!
भाववाढीच्या प्रतीक्षेत आतापर्यंत ८० टक्केच कापूस बाजारात आला असून, अद्यापही २० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. या शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात कापूस विकावा लागला. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतरही भाववाढ मिळाली नसल्याने येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांकडील शिल्लक असलेला कापूस बाजारात येईल. त्यानंतर तो व्यापाऱ्यांकडे गेल्यावर भाववाढीला सुरुवात होऊन याचा फायदा केवळ व्यापाऱ्यांनाच होणार आहे, असे कृषी अभ्यासकांकडून सांगितले जात आहे.