८४ हेक्टरवरच कपाशीची लागवड
By admin | Published: June 11, 2017 12:46 AM2017-06-11T00:46:34+5:302017-06-11T00:46:34+5:30
कापूस उत्पादकांचे क्षेत्र म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. कापसाचे भरघोस उत्पादन घेण्याकरिता शेतकऱ्यांकडून मान्सूनपूर्व पेरणीचे नियोजन करण्यात येते.
मान्सूनपूर्व पेरणीकडे शेतकऱ्यांची पाठ : दमदार पावसाशिवाय पेरणीची घाई नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कापूस उत्पादकांचे क्षेत्र म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. कापसाचे भरघोस उत्पादन घेण्याकरिता शेतकऱ्यांकडून मान्सूनपूर्व पेरणीचे नियोजन करण्यात येते. बेभरोशाच्या पावसामुळे या पेरणीकडे जिल्ह्यातील कापूस उत्पादकांची पाठ होत असल्याचे दिसत आहे. मान्सूनचा पाऊस येण्याचे संकेत असताना या खरीपात मान्सूनपूर्व पेरणीच्या नावावर केवळ ८४ हेक्टर म्हणजेचे २१० एकरावर कपाशीची लागवड झाल्याची नोंद झाली आहे. गत वर्षी पाऊस येण्यापूर्वी हा पेरा ६५२ हेक्टरवर झाला होता.
कापसाचे भरघोस उत्पादन घेण्याकरिता कापूस उत्पादकांकडून मान्सूनपूर्व कपाशीची लागवड करण्यात येत होती. दिवसेंदिवस निसर्गाचा लहरीपणा वाढत असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. परिणामी हळूहळू या मान्सूनपूर्व पेरणीकडे शेतकऱ्यांची पाठ होत असल्याचे दिसून आले. यंदाच्या खरीपात दोन लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्या नियोजनात करण्यात आला आहे. यात मान्सूनपूर्व पेरणी होईल, असे कृषी विभागाला वाटत असताना याकडे मात्र शेतकऱ्यांची पाठच होत असल्याचे झालेल्या नोंदीवरून दिसून येत आहे. गत हंगामाच्या तुलनेत यंदा यात घट होणार असल्याचे संकेत कृषी विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.
शासनाच्या विविध योजनाच्या आधारावर जिल्ह्यात ओलिताची सोय वाढत आहे. मध्यंतरी या ओलिताच्या आधारावर शेतकऱ्यांकडून कपाशीची लागवड झाली होती; मात्र उन्हाचा पारा वाढून पाऊस येण्यास विलंब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती. यामुळे गत दोन-तीन वर्षांपासून या पेरणीकडे शेतकऱ्यांनी पाठ केल्याचे दिसून आले आहे. यामागे निसर्गाचा असमतोल एक कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे मोड येण्याची शक्यता
सध्या आर्थिक परिस्थितीने खचलेला शेतकरी कोणताही धोका पत्करण्याच्या तयारीत नाही. यामुळे बऱ्याच भागात ओलिताची सोय असतानाही पाऊस आल्याशिवाय लागवड नाही, अशी भूमिका घेताना शेतकरी दिसत आहे. गत वर्षी कपाशीची मान्सूनपूर्व लागवड करून पाऊस उशिरा आल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना मोड आल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. यंदा दुबार पेरणी करण्याची शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नसल्याने याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
सर्वाधिक लागवड आर्वी तालुक्यात
यंदाच्या खरीपात मान्सूनपूर्व कपाशीची लागवड जिल्ह्यात सुरू आहे. कापूस उत्पादकांचा पट्टा असलेल्या आर्वी भागात सर्वाधिक क्षेत्रात कपाशीची लागवड करण्यात आली आहे. हे क्षेत्र ४४ हेक्टरवर आहे. तर देवळी तालुक्यात २५ आणि वर्धा तालुक्यात १५ हेक्टरवर मान्सूनपूर्व कपाशीची लागवड झाल्याची नोंद जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात झाल्याची माहिती आहे. ही लगवड गत वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे गत वर्षीच्या नोंदीवरून दिसत आहे.