कापसाचा भाव ५८०० वरच स्थिरावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 10:22 PM2018-10-27T22:22:54+5:302018-10-27T22:23:38+5:30
जिल्ह्यातील खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या कापसाचे यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची चिन्ह दिसत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचा कापूस निघण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, कापूस पणन महासंघ व नाफेडची खरेदी सुरू झालेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या कापसाचे यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची चिन्ह दिसत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचा कापूस निघण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, कापूस पणन महासंघ व नाफेडची खरेदी सुरू झालेली नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत व्यापाऱ्यांची खरेदी सुरू झाली आहे. येथे ५८०० पासून भाव दिल्या जात आहे.
यंदा जागतिक बाजारपेठेत अनेक देशात कापसाचे उत्पादन घटण्याची स्थिती असल्यामुळे कापसाचे भाव वधारतील, अशी आशा आहे. मात्र, सध्या दिवाळी सण तोंडावर असल्याने शेतकरी सण साजरा करण्यासाठी निघालेला शेतमाल थेट बाजार समितीत घेऊन येत आहे. शनिवारी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत ५८५० रूपये क्विंटल दराने कापसाची खरेदी व्यापाऱ्यांनी केली. तर देवळी बाजारपेठेत कापसाला ५८०० ते ५९७१ रूपये पर्यंत भाव देण्यात आला. अशीच परिस्थिती सोयाबीनचीही आहे. सिंदी (रेल्वे) बाजार पेठेत सोयाबीनला २९५० ते ३१८५ भाव मिळाला. देवळी येथे सोयाबीनला २८०० ते ३१३१ रूपये भाव मिळाला. बाजार पेठेत कापूस व सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, व्यापारींची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना सध्या ठराविक भावातच कापूस आणि सोयाबीन विकावे लागत आहे. काही बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. मात्र, तारणात शेतमाल ठेवण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता हा माल विकणे कधीही बरे, अशी प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
पांढरे सोने दगा देण्याची शक्यता
वर्धा जिल्ह्याच्या आर्वी उपविभागातील तालुक्यात कोरडवाहू शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या भागात कपाशी पिकाची लागवड केली जाते. यावर्षी या भागात पाऊस कमी झाल्याने कपाशी पीक एक ते दोन वेच्यानंतर उलंगवाडी करावी लागणार आहे. मात्र सेलू, वर्धा, हिंगणघाट या तालुक्यांमध्ये सिंचनाची सुविधा असल्याने शेतकरी कपाशी पिकाला रात्री व दिवसा भारनियमनाच्या वेळेनुसार पाणी देत असल्याने या भागात कपाशीचे उत्पादन चांगले होण्याची आशा आहे.
खासदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
जिल्ह्यात केवळ ७७ टक्के पाऊस झाल्याने कपाशी व सोयाबीन पिकाचे उत्पादन घटणार आहे. जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यात केवळ तीनच तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हिंगणघाट येथे दौऱ्यावर असताना त्यांच्यासोबत या विषयावर खासदारांनी चर्चाही केली.
आतापर्यंत तीन हजार क्विंटल कापसाची खरेदी
हिंगणघाट, देवळी, वर्धा, आर्वी या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. सुत्रांच्या माहितीनुसार ३ हजार क्विंटल पर्यंत कापूस खरेदी जिल्ह्यात खासगी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली. व शेतकऱ्यांना ५८०० पर्यंत भाव देण्यात आला, अशी माहिती आहे.