कापसाचे भाव वधारले, इतर शेतमालाचे गडगडले; शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच फायदा अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 01:17 PM2022-05-19T13:17:01+5:302022-05-19T13:19:01+5:30
जिल्ह्यात कापसाला १४ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला असून, इतर शेतमालाचे भाव गडगडल्याचे चित्र आहे.
वर्धा : यावर्षी कापसासह सोयाबीनच्या उत्पादनातही कमालीची घट झाल्याने जागतिक बाजारपेठेतही चांगली मागणी होती, तसेच रुपयाच्या अवमूल्यनासह रशिया-युक्रेन युद्धाचाही परिणाम बाजार भावावर पडल्याने कापसाच्या भावात वाढ झाली आहे. जिल्ह्यात कापसाला १४ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला असून, इतर शेतमालाचे भाव गडगडल्याचे चित्र आहे.
खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीनला चांगलाच फटका बसल्याने उत्पादनातही घट झाली. गुलाबी बोंड अळी आणि अवकाळी पावसाने इतर पिकांनाही दणका दिला. खरिपातील हे नुकसान भरून काढण्याकरिता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाकडे लक्ष केंद्रित केले; परंतु रब्बीतही अपेक्षेप्रमाणे उत्पन्न झाले नाही. काही शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचीही लागवड केली.
एकंदरीत उत्पादन घटल्याने सोयाबीनलाही सुरुवातीला चांगलाच भाव मिळाला. त्यानंतर कापसाने हळूहळू दहा हजारांचा आणि आता १४ हजारांचा पल्ला गाठला आहे. या भाववाढीचा फायदा आता व्यापाऱ्यांनाच मिळणार असल्याचे दिसत आहे. बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांनी अद्यापही भाववाढीच्या प्रतीक्षेत कापूस साठवून ठेवला आहे; पण आता खरीप हंगाम तोंडावर असल्याने त्यांनीही हा कापूस विकायला काढला आहे. सध्या बाजारपेठेत कापसाची आवक मंदावली असून, बाजारभाव १४ हजारांच्या आसपासच आहे. मात्र, आता सोयाबीन व तुरीचे भाव कमी झाल्याचे दिसून येत आहे. केंद्र शासनाने गव्हाची निर्यात देखील बंद केल्याने गव्हाचेही भाव कमी झाले आहेत.
कापसाला ऐतिहासिक भाव
यावर्षी सोयाबीनसह कापसालाही ऐतिहासिक बाजारभाव मिळत आहे. सुरुवातीला सोयाबीननेही साडेसात ते आठ हजारांपर्यंत भाव खाल्ला होता. त्यामुळे उत्पन्न घटले तरीही या वाढीव बाजारभावाने उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला, तसेच कापसाने हमीभावाला मागे टाकत १४ हजार ५०० रुपयांचा पल्ला गाठला असून, हा कापसाचा ऐतिहासिक भाव ठरला आहे. अजूनही यात वाढ होऊन १५ हजार रुपयांची सीमा ओलांडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.