सेलू बाजारपेठेत १० हजार क्विंटल कापसाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:41 AM2018-11-17T00:41:11+5:302018-11-17T00:41:50+5:30
सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या सेलू येथील उपबाजारपेठेत कापसाची आवक वाढली आहे. खरेदीच्या मुहुर्तापासून आजपर्यंत १० हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली तर गुरुवारला कापसाला ६ हजार रूपये भाव मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या सेलू येथील उपबाजारपेठेत कापसाची आवक वाढली आहे. खरेदीच्या मुहुर्तापासून आजपर्यंत १० हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली तर गुरुवारला कापसाला ६ हजार रूपये भाव मिळाला.
या बाजार समिती अंतर्गत एकूण ११ जिनिंग असले तरी सिंदी येथे ४ तर सेलू येथे ७ जिनिंग कार्यरत आहे. या ७ जिनिंगमध्ये ६ खरेदीदारांना बाजार समितीचा परवाना तर एका खरेदीदाराला थेट परवाना आहे. बाजार समितीचे सभापती विद्याधर वानखेडे यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केल्याने शेतकºयांनी सुध्दा सहकार्य दिले. नव्याने आलेल्या खरेदीदारांना संधी दिल्याने येथे कापूस खरेदीदार वाढले, लिलाव पध्दतीत योग्य भाव देण्याचा प्रयत्न, कापूस खरेदीत अडत नाही. कापूस विकताच शेतकºयांना चुकाऱ्याचा धनादेश याकडे बारकाईने लक्ष असल्याने आर्वी, खरांगणा, आंजी येथे जाणारा कापूस रोखण्यात काही प्रमाणात यश आल्याने सेलूची बाजारपेठ पांढऱ्या सोन्यानी फुलली आहे. अवघ्या काही दिवसात पुन्हा सेलूच्या बाजारपेठेत नविन खरेदीदार आपली कापूस खरेदी सुरू करणार असल्याने खरेदीदाराची वाढती संख्या पाहता कापसाच्या भावात तेजी राहणार असल्याचे संकेत आहे. बाजार समितीने वीज, सर्पदंश, विद्युत प्रवाहाने बैलाचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना १० हजार रूपये तर गंभीर आजाराच्या उपचारासाठी शेतकऱ्याला ५ हजार रूपये देण्याचा निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. एकूनच या नियोजनामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा कापूस विक्रीत मोठा फायदा होईल असे दिसून येत आहे.
बाजारपेठेत शेतकऱ्यांनी आपला कापूस अनामतमध्ये देवू नये. दिल्यास चुकाऱ्याची हमी बाजार समितीची नाही. व्यापाºयांना प्रत देवून अनामत पध्दतीला विरोध केला आहे. तसेच कापूस विकल्या नंतर दुसºया दिवशी धनादेश वटला नाही तर कापूस उत्पादकांनी थेट बाजार समितीकडे तक्रार करावी. - विद्याधर वानखेडे, सभापती, कृ.उ.बा.स. सिंदी.