सरकीच्या दरावर कापसाची तेजी
By admin | Published: January 28, 2017 12:57 AM2017-01-28T00:57:40+5:302017-01-28T00:57:40+5:30
सध्या कापसाला झळाळी येत आहे. विदर्भाच्या या पांढऱ्या सोन्याला मिळणारे दर आणखी वाढतील अशी
कापूस उत्पादकांना भाववाढीची आशा
वर्धा : सध्या कापसाला झळाळी येत आहे. विदर्भाच्या या पांढऱ्या सोन्याला मिळणारे दर आणखी वाढतील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र कापसाच्या दरात येत असलेली तेजी आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीमुळे नाही तर सरकीच्या वाढत्या दरामुळे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे सरकीच्या वाढीव दरावरच कापसाची तेजी अवलंबून असल्याची बाजारातील स्थिती आहे.
गत काही काळापासून पडलेले शेतमालाचे दर आणि दुष्काळी स्थिती यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थती खालावली आहे. या वर्षी सोयाबीनला दर मिळेल, अशी त्याची आशा होती; मात्र बाजारात सोयाबीनला मिळत असलेल्या दरामुळे निराशा झाली. अशात बाजारात कापसाची आवक सुरू झाली. या पांढऱ्या सोन्याला भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. ती सध्या मिळत असलेल्या दरामुळे पूर्ण होताना दिसत आहे. शासनाने कापसाला दिलेल्या हमीभावापेक्षा बाजारात असलेल्या परिस्थितीमुळे कापसाला सहा हजाराच्या दरम्यान दर मिळत आहेत. हा दर आणखी वाढावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
आज बाजारात कापसाला ५ हजार ८०० रुपयांचे दर मिळत आहे. हे दर शासनाच्या हमीभावापेक्षा अधिक आहे. हे वाढण्याचे संकेतही आहेत. ही वाढ सरकीच्या दरावर अवलंबून आहे. आज बाजारात सरकीचे दर २,६०० ते २,७०० रुपयांवर पोहोचले आहे. यामुळे ज्या कापसात सरकीचे प्रमाण अधिक आहे, अशा कापसाला वाढीव दर मिळत आहे. काही जिल्ह्यातील बाजारात कपाशीला सहा हजाराच्यावर दर मिळत आहे. ते दर कापसात असलेल्या सरकीमुळे मिळत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे जोपर्यंत सरकीचा दर जोपर्यंत कायम राहील तोपर्यंत कपाशीचे दर वाढण्याची आशा आहे.
कापसाचे दर वाढावे अशी स्थिती आंतरराष्ट्रीय बाजारात नाही. गत वर्षीच्या तुलनेत कापूस गाठीचे दर केवळ १५ टक्क्यांनी वाढले आहे. गत हंगामात ७० सेंट असलेले दर आजच्या स्थितीत ८२ सेंटरवर आले आहेत. यामुळे कापसाचे दर वाढीचे संकेत नसल्याचे चित्र आहे. गत हंगामातही अखेरच्या दिवसात कापसाचे दर वाढले होते. ती वाढ सुद्धा सरकीचे दर वाढल्याने झाली होती. आजही तिच स्थिती आहे. ही वाढ आणखी किती दिवस राहील, हे सांगणे सध्या अवघड आहे. यामुळे सध्या मिळत असलेले कापसाचे दर शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा आहे. सरकीचे दर जर वाढत राहिले तर कापसाचे दर वाढणे शक्य आहे. सध्या ढेपीचे दर वाढतील, अशी स्थिती बाजारात नाही.(प्रतिनिधी)
लाभासाठी कापूस घरीच
४कापसाचे दर आणखी वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना आहेत. सध्या कापसाला ५ हजार ८०० रुपयांच्या आसपास दर मिळत आहेत. यामुळे हे दर वाढतील अपेक्षा शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस त्यांच्या घरी साचून ठेवला आहे. दर वाढीच्या अपेक्षेत कापसाची बाजारात येणारी आवक मंदावल्याचे चित्र आहे.
आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला असता बाजारात कापसाचे दर वाढण्याची सध्या स्थिती नाही. आज सरकीचे दर वाढल्याने कापसाचे दर वाढत आहे. साधारणत: १६०० ते १७०० रुपये दर असलेली सरकी आज २६०० ते २७०० रुपयांच्या दरम्यान आहे. यामुळे कपाशीला वाढीव दर मिळत आहे. कापसाच्या काही व्हेरायटीत सरकीचे प्रमाण अधिक असल्याने त्यांना सहा हजाराच्यावर दर मिळाला आहे. प्रत्येक कापसाला हाच दर मिळेल, हे सांगणे कठीण आहे. यामुळे येत्या दिवसात जर सरकीचे दर आणखी चढले तर कापसाचे दर आणखी वाढेल, यात शंका नाही.
- विजय जावंधिया, कृषी अभ्यासक, वर्धा