वेचणीच्या कापसाला दहा दिवसात फुटले कोंब; शेतकरी हवालदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 05:45 PM2020-10-29T17:45:06+5:302020-10-29T17:48:17+5:30
Wardha News Cotton कापूस वेचणी करून घरात भरून ठेवल्यानंतर अवघ्या दहा दिवसात त्याला पुन्हा कोंब फुटल्याने वर्धा जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: यंदाच्या वर्षी सततच्या पावसाने जिल्ह्यातील कापुस उत्पादकांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. समुद्रपुर तालुक्यातील पाईकमारी या गावातील दोन शेतकऱ्यांना ८ एकर शेतजमिनीवर कापुस उत्पादन्न घेण्यासाठी ८५ हजाराचा खर्च आला आहे.
पण प्रत्यक्षात कापसाची वेचणी केल्यावर या शेतकऱ्याला सध्या २० क्विंटल कापसाचे उत्पन्न झाले व तो कापुस त्यांनी घरात भरुन ठेवला असता त्या कापसाला फक्त दहाच दिवस झाले असतांनाच कापसाला अक्षरश: कोंबच फुटले आहेत. समुद्रपूर तालुक्यातील पाईकमारी येथील रहिवासी असलेले कैलास देवतळे व गणेश लढी यांनी खरीप हंगामाच्या सुरुवातीला त्यांच्या शेतात ८ एकर शेतात कापसाची लागवड केली होती सुरुवातीला झालेला पाऊस आणि पिकाची योग्य पद्धतीने पाहाणी असल्याने पिकाची वाढ व फुले बोंडे बऱ्याच पैकी होती. सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला पिकांची परिस्थिती बघितल्यावर भरघोस उत्पन्न होईल असे वाटत होते. परंतु सप्टेंबर महिन्यात आलेल्या सततच्या पावसाने उभ्या फुटलेल्या कापसाच्या पिकाला चांगलाच फटका बसवला व त्यामुळे कापुस शेतातच पडायला लागला.
अशातच सम्पुर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहिल्याने आणि हवामान खात्याकडून पुढील काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने या दोन्ही शेतकऱ्यांनी घावपड करत वेचणी करीता मजुर आणले व शेतातील कापसाची वेचणी केली. वेचणी अंती त्यांना कापसाचे ८ एकर मध्ये एकूण २० क्विंटल उत्पन्न झाले व त्यांनी ह्या कापसाला चांगला भाव मिळेल या आशेने कापुस घरी भरुन ठेवला. परंतु कापसाला घरीच कोंब फुटल्याने शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.
उत्पादकांची अडचण लक्षात घेता राज्य शासनाने नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी भरीव शासकीय मदत जाहीर करावी अशी मागणीही शेतकरी कैलास देवतळे व गणेश लढी यांनी केली आहे. हीच परिस्थिती जर पुन्हा काही शेतकऱ्यांनवर येण्याची वेळ असून हवालदिल शेतकऱ्यांना शासनाच्या आर्थिक मदतीची प्रतिक्षा आहे असे सांगण्यात येत आहे.